क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकण्यावर आता पेटीएम २ टक्के शूल्क वसूल करणार आहे. नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे पेटीएमने म्हटले आहे. अनेक ग्राहक क्रेडिट कार्डमधून पेटीएममध्ये पैसे ट्रान्सफर करतात. नंतर तर पैसे आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात. या व्यवहारावर कोणतेच शूल्क नव्हते. आता या व्यवहारासाठी पेटीएम २ टक्के शूल्क लावणार आहे. नेटबँकिंग आणि डेबिट कार्डद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यावर कोणत्याही प्रकारचे शूल्क लागू होणार नाही.
नोटाबंदीचा फायदा उठवण्यासाठी पेटीएमने कोणत्याही पद्धतीने पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकण्यावर शून्य टक्के व्यवहार शूल्क ठेवले होते. पेटीएम वॉलेटमधून ग्राहकाच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठीही पेटीएम कोणतेही शूल्क आकारत नाही.
पेटीएमने बुधवारी जारी केलेल्या आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय, जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकता. तर त्यासाठी तुम्हाला मोठे शूल्क द्यावे लागेल. जर एखादा ग्राहक वॉलेटमध्ये पैसे टाकल्यानंतर ते बँक खात्यात ट्रान्सफर केल्यास आमचे नुकसान होते. दि. ८ मार्चपासून अशा व्यवहारांवर २ टक्के शूल्क लावण्यात येणार आहे. हे पैसे आम्हाला तेव्हाच फायदेशीर ठरतील जेव्हा याचा उपयोग वस्तू खरेदी किंवा सेवेसाठी होईल, असे पेटीएमने म्हटले.
पेटीएम वॉलेटचा उपयोग क्रेडिट कार्ड पॉईंट्स जमा करण्यासाठीही केला जाता. अशा प्रसंगी पेटीएमला ३ ते ४ टक्के मर्चंट डिस्काऊंट रेट (एमडीआर) द्यावे लागते. क्रेडिट कार्डमधून जमा केलेल्या रकमेचा बाजारात उपयोग केल्यास काहीच शूल्क लागत नाही.