भारतीय लष्कराशी प्रत्यक्ष युद्धभूमीवर दोन हात करण्याची ताकद नसल्याने पाकिस्तान छुप्या दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारतीय लष्कराला जेरीस आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा अहवाल अमेरिकी संरक्षण मुख्यालय पेंटागॉनने अमेरिकी काँग्रेसकडे सादर केला आहे. भारतानेही पेंटागॉनच्या या अहवालाची संधी साधत पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असून आंतरराष्ट्रीय समुदायातही हेच चित्र उभे राहात असल्याची टीका केली आहे.
अमेरिकी काँग्रेसकडे सादर केलेल्या या १०० पानी अहवालात पेंटागॉनने पाकिस्तानी सैन्याच्या सद्यस्थितीबाबत भाष्य केले आहे.
भारताशी प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढू शकत नसल्याने खच्चीकरण झालेल्या पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना छुपा पाठिंबा देत भारतविरोधी कारवायांना चिथावणी देणे सुरू ठेवले आहे. या कारवायांच्या माध्यमातून भारतीय लष्कराला जेरीस आण्याचा पाकिस्तानचा सतत प्रयत्न असतो. तसेच अफगाणिस्तानातही पाकिस्तानचे उपद्रवमूल्य वाढले असल्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.
अफगाणिस्तानातील आपला प्रभाव संपुष्टात आला आहे. तरीही अफगाणिस्तानात मदतकार्य करण्याचा आव आणत प्रत्यक्षात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा डावा पाकिस्तान करत असल्याचे पेंटागॉनने या अहवालात म्हटले आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पाक सरकार वरकरणी वागत असले तरी त्यांचा अंतस्थ हेतू अफगाणिस्तानातील भारताचा प्रभाव पुसून टाकण्याचाच आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदी शपथविधी सोहळ्याच्या वेळी हेरातमध्ये भारतीय दूतावासावर झालेला  दहशतवादी हल्ला हे त्याचेच द्योतक असल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीही पेंटागॉनने असाच अहवाल दिला होता. मात्र, त्यावर अमेरिकेने काहीही कार्यवाही केली नव्हती.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा सक्रिय सहभाग असतो, हेच पेंटागॉनच्या अहवालातून स्पष्ट होते. भारताने यापूर्वीच हे सप्रमाण सिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायालाही हे आता पटू लागले असल्याचेच हे द्योतक आहे.
सईद अकबरुद्दिन,
परराष्ट्र खात्याचे प्रवक्ता