मधुबनी (बिहार) : बिहारमध्ये मतदार यादीच्या सुरू असलेल्या ‘विशेष सखोल फेरतपासणी’वरून (एसआयआर) केंद्रातील ‘रालोआ’ सरकारवर थेट हल्ला चढवत, संविधानाचे रक्षण करण्यासाठी आता नागरिकांनीच त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण केले पाहिजे, असे आवाहन काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केले. बिहारमधील ‘एसआयआर’मुळे भाजप आणि निवडणूक आयोगाचा बनाव उघड होत आहे. म्हणूनच नागरिकही आता भाजप नेत्यांना ‘मतदान चोर’ म्हणू लागले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

काँग्रेसच्या ‘मतदार अधिकार यात्रे’चा भाग म्हणून मधुबनी जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. भाजप नेते निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करीत आहेत. म्हणूनच नागरिकांनी त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचे आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी आता पुढे येणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी या वेळी म्हणाले.

नागरिकांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे की, त्यांनी त्यांच्या मतदानाचा अधिकार गमावला तर संविधानाचे रक्षण करता येऊ शकणार नाही. निवडणूक आयोगाने बिहारमधील मतदार याद्यांमधील ६५ लाख नावे वगळली आहेत आणि आता भाजपला मदत करण्यासाठी नव्याने ६५ लाख नावे नव्याने मतदार यादीत जोडली जातील, असा दावाही राहुल यांनी केला.

‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, भाजप सरकार आणखी ४०-५० वर्षे टिकेल. आता मला समजले की त्यांनी ते सांगितले कारण ते ‘मत चोरी’मध्ये सहभागी आहेत आणि त्याची सुरुवात गुजरातमधूनच झाली,’ असे राहुल गांधी या वेळी म्हणाले. भाजपवरील ‘मतचोरी’च्या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांनी एकही शब्द उच्चारला नाही, याकडेही राहुल यांनी लक्ष वेधले. भारताची राज्यघटना सर्वांना समान अधिकार देते. त्यामुळेच संघ राज्यघटनेचा आदर करत नाही, असा आरोपही राहुल यांनी केला.