जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांशी लढणाऱ्या जवानांवर नागरिकांकडून दगडफेक

जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक उडाली आहे

संग्रहित छायाचित्र

जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक उडाली आहे. नौगाम येथील सुथू येथे ही चकमक सुरु आहे. चकमकीदरम्यान जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. याआधी बुधवारी दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला होता. ज्यानंतर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

सुरक्षा जवानांनी परिसराला घेराव घातला आहे. दरम्यान डीआयजी व्ही के बिरदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्हाला गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही सीआरपीएफसोबत सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. लोक आमच्यावर दगडफेक करत आहेत. आम्ही कोणालाही जवळ येऊ नका अशी विनंती करत आहोत. कारण दहशतवाद्यांकडे स्फोटकं असण्याची शक्यता आहे’.

मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग एक दिवसाच्या श्रीनगर दौऱ्यावर आले होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, ‘आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं पाऊल टाकत पाकिस्तानला गेले आणि तेथील जबाबदार व्यक्तींसहित त्यांच्या कुटुंबाचीदेखील भेट घेतली. जेणेकरुन संबंध सुधरण्यास मदत व्हावी. पण पाकिस्तानने चर्चेसाठी योग्य वातावरण निर्माण केलं नाही’.

राजनाथ सिंह हे मंगळवारी जम्मू – काश्मीरच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. त्यांनी राज्यातील वरिष्ठ नागरी, पोलीस आणि संरक्षण दलांच्या अधिकाऱ्यांशी संरक्षणविषयक स्थितीवर चर्चा केली. तसेच राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची देखील त्यांनी भेट घेतली. यानंतर राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘भारत सरकार पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र, दहशतवादी कारवाया आणि चर्चा दोन्ही एकाचवेळी होऊ शकत नाही. पाकिस्तानने आधी दहशतवाद्यांना मदत करणे थांबवावे, असे सिंग यांनी सांगितले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: People pelting stones during encounter between army jawan and teerorist

ताज्या बातम्या