आयटी क्षेत्रातल्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेली इन्फोसिस या कंपनीमध्ये नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दर तिमाहीतल्या आकड्यांवर नजर टाकल्यास लक्षात येईल की यामध्ये मोठे बदल झाले आहेत. सामान्यपणे आयटी कंपन्या हुशार आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.


आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, इन्फोसिसने बुधवारी जानेवारी ते मार्च २०२२ या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध केली. यामध्ये आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत २७.७ टक्के कर्मचारी नोकरी सोडून गेले आहेत. ही संख्या गेल्या १२ महिन्यांमध्ये नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ही सातत्याने तिसरी तिमाही आहे, जेव्हा नोकरी सोडणाऱ्यांची संख्या २० टक्क्यांहूनही अधिक आहे. या प्रकरणी कंपनीने आपली प्रतिस्पर्धी कंपनी TCS लाही मागे टाकलं आहे. TCS ने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे नोकरी सोडणाऱ्यांचं प्रमाण १७.४ टक्के इतकं आहे.


आयटी क्षेत्रामध्ये लोकांनी नोकरी सोडण्याचं कारण म्हणजे दुसऱ्या कंपन्यांकडून मिळणारी चांगली पॅकेजेस. याशिवाय हुशार आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक कंपन्या इतर कंपन्यांमधले असे कर्मचारी हेरून त्यांनी मोठं पॅकेज देऊन आपल्याकडे नोकरी देतात.