हिमाचल प्रदेशच्या बीर बिलिंग या ठिकाणी गिर्यारोहणासाठी गेलेल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह मंगळवारी सापडले. या सगळ्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली ती म्हणजे ४८ तास या मृतदेहांची राखण एका पाळीव श्वानाने केली. या दोन गिर्यारोहकांसह त्यांचा जर्मन शेफर्ड श्वानही होता. या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर या श्वानाने ४८ तास या मृतदेहांची राखण केली.
पठाणकोटचा ३० वर्षीय अभिनंदन गुप्ता आणि पुण्याला राहणारी २६ वर्षीय प्रणिता वाला हे दोघं पाळीव श्वान घेऊन गिर्यारोहणासाठी गेले होते. मात्र गिर्यारोहण करताना या दोघांचा मृत्यू झाला. या दोघांचा मृत्यू डोंगरकड्यावरुन खाली पडून झाला असावा असा अंदाज व्यक्त होतो आहे. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र चकीत करणारी बाब ही होती की या दोघांसह आलेला पाळीव श्वान दोन दिवस या मृतदेहांची राखण करत होता.
बीर बिलिंग या ठिकाणी घडली घटना
हिमाचल प्रदेशात ५ हजार फूट उंचीवर असलेलं बीर बिलिंग ट्रेकिंग हे गिर्यारोहकांचं आवडतं ठिकाणी आहे. या ठिकाणाहून पॅराग्लायडिंगही केलं जातं. कांगडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वीर बहादुर यांनी याबाबत माहिती दिली की अभिनंदन गुप्त हे पॅराग्लाईडिंग आणि ट्रेकिंग मागच्या चार वर्षांपासून अग्रेसर होते. प्रणिता वाला ही तरुणी पुण्याहून आली होती. या भागात काही काळ हिमवर्षाव झाला त्यानंतर ते बाहेर पडले होते. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत काय म्हटलं आहे?
पोलिसांनी ही माहितीही दिली आहे की प्राथमिक तपासावरुन हे समजतं आहे की गिर्यारोहकांचा चार जणांचा समूह एका कारने निघाला होता. यामध्ये दोन महिलांचाही सहभाग होता. कार एका विशिष्ट ठिकाणाच्या पुढे जाऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पायी चालण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी हवामानात बदल झाला. त्यावेळी दोघेजण माघारी फिरले. मात्र अभिनंदन गुप्ता यांनी असं सांगितलं की त्यांना पुढचा रस्ता माहीत आहे. त्यामुळे अभिनंदन, प्रणिता आणि पाळीव श्वान असे पुढे गेले. मात्र हे दीर्घ काळ परतले नाहीत. त्यामुळे ते हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यांचा शोध घेण्यासाठी एक पथकही पाठवम्यात आलं. पॅराग्लायडर ज्या ठिकाणाहून उड्डाण करतात त्या पॉईंटपासून तीन किमी अंतरावर या दोघांचे मृतदेह आढळले.
हे पण वाचा- अमेरिकेत आणखी एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, अभयारण्यात मिळाला मृतदेह
वरिष्ठ पोलीस अधिकारी बहादुर यांनी पर्यटकांना आणि गिर्यारोहकांना हा सल्ला दिला आहे की कांगडा या ठिकाणी हिमवृष्टी होते आहे. तसंच वातावरणातही बदल होत आहेत. त्यामुळे गाईड घेतल्याशिवाय किंवा योग्य माहिती घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये.