नवी दिल्ली : दररोज सुरू असलेल्या दरवाढीमुळे रविवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरांनी लिटरला ९५ रुपयांचा, तर डिझेलच्या दरांनी ८६ रुपयांचा टप्पा आजपर्यंत पहिल्यांदाच ओलांडला. देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे.

पेट्रोलच्या दरांत लिटरला २१ पैशांची, तर डिझेलच्या दरांत लिटरमागे २० पैशांनी वाढ करण्यात आल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

४ मेपासून विसाव्यांदा करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे देशभरातील इंधनाच्या दरांनी ऐतिहासिक विक्रम केला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तेलंगण ही राज्ये आणि लडाखच्या केंद्रशासित प्रदेशांत पेट्रोल आता शंभरीपार पोहचले आहे.

दिल्लीत पेट्रोलचे दर आजवरचे सर्वाधिक, म्हणजे लिटरला ९५.०९ रुपये, तर डिझेलचे दर लिटरमागे ८६.०१ रुपये झाले आहेत.

पेट्रोल लिटरला १०० रुपयांहून अधिक दराने विकले जात असलेले मुंबई हे २९ मे रोजी देशातील पहिले महानगर ठरले होते. मुंबईत आता पेट्रोलसाठी लिटरला १०१.३ रुपये, तर डिझेलसाठी लिटरमागे ९३.३५ रुपये मोजावे लागत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूल्यवर्धित करासारखे (व्हॅट) स्थानिक कर आणि मालवाहतुकीचा खर्च यांच्या आधारे देशात इंधनाचे दर प्रत्येक राज्यांत वेगवेगळे आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोल व डिझेलवर देशात सर्वाधिक व्हॅट आकारला जातो. याखालोखाल मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तेलंगण ही राज्ये येतात.