Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. हेल्मेट न घातल्यामुळे इंधन भरण्यास एका पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने नकार दिला. मात्र, इंधन भरण्यास नकार दिल्याने दोन दुचाकीस्वारांना राग अनावर झाला आणि त्यांनी थेट संबंधित पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. या घटनेत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ५५ वर्षीय तेज असं पीडित व्यक्तीचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

हेल्मेट नसल्याने पेट्रोल देण्यास नकार दिल्याच्या कारणास्तव पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची ही घटना शनिवारी पहाटे ५ वाजता भिंड-ग्वाल्हेर राष्ट्रीय महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर घडली. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. झालं असं की दोन दुचाकीस्वार पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आले होते. मात्र, त्यांनी हेल्मेट घातलं नव्हतं. त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल भरण्यास नकार दिला.

दरम्यान, पेट्रोल भरण्यास नकार दिल्याने दोन दुचाकीस्वारांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतप्त झालेल्या दोन दुचाकीस्वारांनी पिस्तूल काढली आणि गोळीबार केला. यामध्ये एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गोळीबाराची ही घटना कैद झाली. यामध्ये एक जण पिस्तूलने गोळीबार करत असल्याचं दिसून आलं आहे. पंपावरील कर्मचारी पळत असताना दोन्ही आरोपींनी अनेक गोळ्या झाडल्या.

दरम्यान, गोळीबारानंतर जखमी झालेल्या एका कर्मचाऱ्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भिंड पोलिसांनी माध्यमांना या घटनेची माहिती देताना सांगितलं की, पेट्रोल पंपावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या हल्लेखोरांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यांना पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आलेलं आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर बिजपुरी गावातील रहिवासी आहेत. बिजपुरीमध्ये कुस्तीचा एक कार्यक्रम सुरू होता आणि दोघे जण त्यांच्या दुचाकीवर इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले होते. आम्ही सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवली आहे. त्यांना लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.