पेट्रोलच्या किंमतीत गुरुवारी मध्यरात्रीपासून सरासरी एक रुपयाने कपात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्याने हा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलच्या दरात कपात करण्याची ही गेल्या दोन महिन्यांतील दुसरी घट. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात ५६ पैसे कपात करण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तेलाच्या मागणीत घट झाल्यामुळे किमती घसरल्या आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया अस्थिर असल्यामुळे सद्यपरिस्थिती नाजूक आहे. मात्र, असे असले तरी जागतिक बाजारपेठेत किमती घसरल्याने पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आल्याचे कारण इंडियन ऑइल कॉर्पोरेशनतर्फे देण्यात आले आहे. जून, २०१० पासून केंद्र सरकारने इंधनाच्या दरावरील नियंत्रण मागे घेतल्यामुळे जागतिक बाजारातील तेलाच्या किमतीनुसारच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरत आहेत. त्याचे नियंत्रण आता इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम यांच्याकडे गेले आहे. ऑक्टोबर महिन्यात ५६ पैशांनी कपात करण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ केल्याने अलीकडेच पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता गुरुवार मध्यरात्रीपासून इंधनाच्या दरात ९५ पैसे कपात करण्यात आली. मात्र, संबंधित राज्यातील विक्री कर आणि मूल्यवर्धित कर (व्हॅट) यांनुसार त्या त्या राज्यातील पेट्रोलच्या किमती ठरणार
आहेत.     
शहर            सध्याचे दर    सुधारित दर
दिल्ली             ६८.१९ रु.    ६७.२४ रु.
कोलकाता      ७५.७४ रु.    ७४.७३ रु.
मुंबई             ७३.५३ रु.    ७१.७७ रु.
चेन्नई           ७१.७७ रु.    ७०.५७ रु.