उत्तर कोरियासमवेत युद्ध सुरू झाल्यास अमेरिकेच्या फौजांना फिलिपाइन्समधील लष्करी तळावर वास्तव्याची मुभा देण्यात येईल, असे परराष्ट्रमंत्री अल्बर्ट डेल रोझारिओ यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिका अथवा फिलिपाइन्सवर हल्ला झाल्यास आम्ही परस्पर सहकार्य करण्याचा करार केला आहे. कोरियाच्या द्वीपकल्पात तणावाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच रोझारिओ यांनी वरील बाब स्पष्ट केली आहे.
त्यामुळे युद्ध पुकारण्यात आलेच तर आम्ही अमेरिकेला आमच्या लष्करी तळाचा वापर करण्याची मुभा देऊ, असे ते म्हणाले.
 उत्तर कोरियाने गेल्या डिसेंबर महिन्यात रॉकेटची चाचणी
केली आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आण्विक चाचणी केली, त्यामुळे कोरियाच्या द्वीपकल्पात लष्करी तणाव वाढला असून आण्विक युद्धाचे ढग जमले आहेत.
अमेरिकेला देशातील लष्करी तळाचा वापर करण्याची मुभा देण्याबरोबरच आणखी टोकाची पावले उचलण्याची तयारी
करण्यात आल्याचे फिलिपाइन्सचे संरक्षणमंत्री व्हॉल्टेअर गॅझमीन यांनी शुक्रवारीच स्पष्ट केले.
अमेरिकेची चीनकडे मदतीची मागणी
बीजिंग : उत्तर कोरियाच्या ठाम भूमिकेमुळे निर्माण झालेला आण्विक तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी उत्तर कोरियाचा जवळचा मित्र असलेल्या चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. दक्षिण कोरियाच्या अध्यक्ष पार्क ग्यून-ह्य़े यांची भेट घेतल्यानंतर केरी यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची प्रथम भेट घेतली. आमच्यापुढे अनेक आव्हानात्मक प्रश्न आहेत त्यामुळे प्रथम आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपण आलो आहोत, असे केरी यांनी वांग यांना सांगितले. चीनने उत्तर कोरियाची १९५०-५३च्या युद्धापासून पाठराखण केली आहे. त्यामुळे उत्तर कोरियाच्या भूमिकेमुळे निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी अमेरिकेने बीजिंगच्या सहकार्याची मागणी केली आहे.