अयोध्येत नव्याने बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मंदिर समितीने या दिवशी मोठ्या सोहळ्याचं आयोजन केलं असून हजारो लोकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवलं आहे. एका बाजूला मंदिराचं बांधकाम वेगाने चालू आहे. दुसऱ्या बाजूला मंदिरात होणाऱ्या सोहळ्याची तयारीदेखील चालू आहे दरम्यान, २२ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला स्थगिती द्यावी, यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होऊ नये, अशी मागणीदेखील केली आहे. याचिकाकर्त्याने चार पीठांच्या शंकराचार्यांनी या कार्यक्रमावर घेतलेल्या आक्षेपांचा दाखला दिला आहे. शंकराचार्यांच्या मते हा सोहळा सनातन पंरपरेच्या विरोधात आहे.

गाझियाबाद येथील रहिवासी भोला दास यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात नुकतीच एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी आरोप केला आहे की, भारतीय जनता पार्टी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वतःचा राजकीय फायदा साधण्यासाठी घाईघाईने २२ जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहे. हिंदू धर्मात पौष महिन्यात कोणतेही धार्मिक विधी केले जात नाहीत. त्याचबरोबर मंदिरदेखील अद्याप बांधून तयार झालेलं नाही. अपूर्ण मंदिरात कोणत्याही देवी-देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही. त्यामुळे शंकराचार्यांनी या सोहळ्यावर आक्षेप नोंदवला आहे. तसेच शंकरायार्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारलं आहे.

भोला दास यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होणं आपल्या संविधानाविरोधात आहे. हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारची राजकीय स्टंटबाजी आहे. दास यांनी मंगळवारी ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान, याचिकाकर्त्याचे वकील अरविंद कुमार बिंद यांनी सांगितलं की, मंगळवारी आम्ही ही याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने आमची याचिका स्वीकारून लवकरात लवकर यावर सुनावणी घ्यावी. त्यासाठी आम्हीदेखील प्रयत्न करणार आहोत.

शंकराचार्यांचाही आक्षेप

शंकराचार्यांनी म्हटलं आहे की, सनातन धर्मानुसार मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला हवी. उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, ‘‘हा सोहळा सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला चार शंकराचार्यांपैकी कोणीही उपस्थित राहणार नाही. आमच्या मनात कुणाच्याहीप्रति द्वेष नाही. परंतु, हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांना तसे सुचवणे ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे.

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करून तिथे देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही धर्मशास्त्राविरोधात जाऊ शकत नाही. मंदिराच्या बांधकामात आणि कार्यक्रमाच्या आयोजनात गुंतलेले हिंदू धर्मातील प्रस्थापित सर्वच जण या महत्त्वाच्या नियामांकडे दुर्लक्ष करत आहेत.