राफेल करारात मोदींनी अंबानींचे मध्यस्थ म्हणून काम केले, काँग्रेसचा आरोप

रिलायन्स आणि सरकारतर्फे फ्रान्स मीडियाने केलेला दावा फेटाळण्यात आला आहे

राफेल करार सुरू असताना अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला ११२० कोटींची करमाफी देण्यात आल्याचे वृत्त ले माँड फ्रेंच वृत्तपत्राने प्रसारित करताच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबानींचे मध्यस्थ म्हणून काम केले असा आरोप काँग्रेसने केला आहे.

आधीच राहुल गांधी यांनी राफेल कराराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत त्यांना जेरीस आणले आहे. आता त्यात पुन्हा एकदा फ्रान्स मीडियाने अनिल अंबानी यांच्या कंपनीला ११२० कोटींची करमाफी दिल्याचे वृत्त दिले आहे. त्यामुळे काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान राफेल करार आणि करमाफीचा काहीही संबंध नाही असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या दोन्हींचा संबंध एकमेकांशी जोडू नये असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

तर रिलायन्स कम्युनिकेशननेही हे आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. आम्ही फ्रान्समधल्या कंपन्यांसाठीच्या नियमांचे पालन केले आहे. हा कायदा फ्रान्समधील सगळ्यांनासाठी सारखा आहे असेही रिलायन्सने म्हटले आहे. तसेच राफेल करार आणि करमाफीचा परस्पर संबंध नाही असेही स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pm modi acted as middleman for anil ambani congress alleges after le monde report on rafale