PM Narendra Modi To Attend ASEAN Summit Virtually: पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्याच्या अखेरीस क्वालालंपूर येथे होणाऱ्या आसियान शिखर परिषदेसाठी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार असल्याने, त्यांच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणाऱ्या संभाव्य भेटीबद्दलच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी क्वालालंपूरला जाणार असल्याची शक्यता आहे, असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, भारत आणि अमेरिका तणावानंतर पुन्हा संबंध सुधारण्याचा विचार करत असल्याने, “येत्या आठवड्यात” मोदींना भेटण्यास ते उत्सुक आहेत. यामुळे दोन्ही नेते आसियान शिखर परिषदेत भेटू शकतात, अशी चर्चा सुरू झाली होती.

या शिखर परिषदेला व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहण्याचा निर्णय पंतप्रधानांनी स्वतः गुरुवारी एक्स पोस्टच्या माध्यमातून जाहीर केला.

“माझे प्रिय मित्र, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी उत्तम चर्चा झाली. मलेशियाला आसियान शिखर परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आसियान-भारत शिखर परिषदेत व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होण्यासाठी आणि आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी भक्कम करण्यासाठी मी उत्सुक आहे”, असे पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, ट्रम्प यांना टाळायचे होते म्हणून मोदी आसियान परिषदेला जाणार नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

२०१४ ते २०१९ दरम्यान झालेल्या प्रत्येक शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. २०२० आणि २०२१ च्या शिखर परिषदा कोविड-१९ मुळे व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. फक्त २०२२ मध्ये पंतप्रधान मोदी या शिखर परिषदेला उपस्थित राहिले नव्हते.

गेल्या काही वर्षांत पंतप्रधान मोदींच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाचा भाग म्हणून भारताने १० सदस्यीय आसियान गटाशी संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी या शिखर परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित न राहण्याच्या निर्णयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.