पाच राज्यांमध्ये पुणे पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अनेक ठिकाणी छापे मारले आहेत. पी वरावर राव, गौतम नवलखा, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, अनू भारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा माओवाद्यांचा कट होता असा दावा करण्यात येत आहे.

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून त्याच्याशी संबंधित या अटका आहेत. पुण्यामधून वरावर रावना अटक केल्यानंतर त्यांच्या हैदराबाद येथील घरावरही छापा मारण्यात आला. नवलखाना दिल्लीतून अटक करण्यात आली व साकेत कोर्टात हजर करण्यात आले. त्यांचा तांबा महाराष्ट्र पोलिसांकडे देण्यात येणार आहे. पोलिसांनी नवलखा यांच्या घरातून बॅग, लॅपटॉप व काही कादगपत्रं जप्त केली आहेत.

मानवाधिकार कार्यकर्त्याव वकिल सुधा भारद्वाज यांना फरीदाबादमधून अटक करण्यात आली व महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना स्थानिक न्यायालयासमोर हजर केले. भारद्वाज यांच्या बदरपूर येथील घरावरही छापा मारण्यात आला. त्यांची मुलगी अनू हिलाबी पोलिलांनी ताब्यात घेतले आहे.
अरूण परेराना पुण्यातून अटक करण्यात आली असून परेरा यांनी आपण निष्पाप असल्याचा दावा केला आहे. आपण काही खटल्यांमध्ये सरकारविरोधी काम केल्याने अटक केल्याचा त्यांचा दावा आहे. आपली अटक म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मुंबईमधून कार्यकर्ते व्हर्नॉन गोन्सालवीस यांना अटक करण्यात आली असून स्टॉन स्वामीना झारखंडमधल्या रांचीमधून अटक करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्या गोव्यातील घराचीही झडती घेण्यात आली, परंतु तेलतुंबडे घरी नव्हते. सर्व आरोपींना कोठडी देण्यात आली असून त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पुण्यामध्ये 31 डिसेंबर 2017 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेसंदर्भातील माओवादी कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एल्गार परिषदेमुळेच कोरगाव भीमाची दंगल घडल्याचा आरोप आहे. माओवाद्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या राजीव गांधीप्रमाणे करण्याचा कट होता असा पोलिसांचा दावा आहे. या सगळ्या कटाचा उलगडा या अटकांमुळे होईल असा अंदाज आहे.