अखेर काँग्रेसला २४ वर्षानंतर गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी शशी थरुर यांचा पराभव केला आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मल्लिकार्जुन खरगेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं आहे. “नवनिर्वाचित अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे जी यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा. त्यांचा पुढील कार्यकाळ फलदायी जावो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सोमवारी ( १७ ऑक्टोंबर ) काँग्रेस अध्यक्षपदासाठी देशभरात मतदान झाले होते. बुधवारी त्याची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी ६८२५ मतांनी शशी थरुर यांचा पराभव केला. खरगे यांना ७८९७ तर, थरुर यांना १०७२ मते पडली. एकून ९३८५ जणांनी मतदान केलं. ४१६ मते अवैध ठरवण्यात आली.

हेही वाचा : २४ वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपद गांधी कुटुंबाबाहेर; विजयानंतर मल्लिकार्जून खरगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “शशी थरूर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निकालानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर पक्षांतर्गत निवडणूक घेऊन देशाच्या लोकशाहीला मजबूत करण्याचं उदाहरण समोर ठेवलं आहे. पक्षांतर्गत निवडणूक यशस्वीपणे घेतली यासाठी मी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि या कार्यक्रमाशी संबंधित सर्वांचे मी आभार मानतो. या सर्वांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत काँग्रेसला मजबूत केलं आहे.”