नोटाबंदीच्या तयारीवरुन आणि निर्णयाच्या अंमलबजावणीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘काहींना सरकारची तयारी कमी पडल्याचे दु:ख नाही. त्यांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, याचे दु:ख आहे,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर शरसंधान साधले आहे.

‘नोटाबंदीच्या निर्णयात आणि त्याच्या अंमलबजावणीत सरकारची तयारी कमी पडली असे काहीजण म्हणत आहेत. मात्र त्यांना सरकारची तयारी कमी पडल्याचे दु:ख नाही. त्याबद्दल त्यांच्याकडून टीका होत नाही आहे. अचानक हा निर्णय हा जाहीर केल्याने त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळच न मिळाल्याचे त्यांना दु:ख आहे. त्यांना मी तयारीसाठी ७२ तास दिले असते, तरी त्यांनी आज माझी स्तुती केली असती,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान मोदी संविधान परिषदेत बोलत होते.

‘भ्रष्टाचारात भारताचा क्रमांक खूप वरचा लागतो. त्यामुळे मान शरमेने खाली जाते. हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी विरोधी पक्षांसह सर्वांनाच सहकार्याचे आवाहन करतो’, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. लोकांना त्यांच्याच कष्टाचे पैसे बँकेतून काढता येत नाहीत, लोकांना स्वत:च्या कष्टाचा पैसा वापरता येत नाही, या विरोधकांच्या टिकेला पंतप्रधान मोदींनी प्रत्तुत्तर दिले आहे. ‘प्रत्येकाला त्याचे पैसे वापरण्याचा अधिकार आहे. देश पारदर्शी व्यवहारांकडे जातो आहे. कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे देशाची वाटचाल सुरू आहे,’ असे मोदी यांनी म्हटले आहे.

‘नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फायदा महापालिका आणि नगरपालिकांना झाला. या महापालिकांना आधी कर गोळा करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागायची. तरीही साधारणत: तीन ते साडेतीन हजार कोटींचा कर गोळा होता. मात्र ८ नोव्हेंबरपासून महापालिका, नगरपालिकांच्या तिजोरीत तिप्पट-चौपट कर जमा झाला आहे,’ असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.