PM Modi Donates Money To BJP Party Fund: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला (भाजप) ‘पार्टी फंड’ म्हणून २००० रुपयांची देणगी दिली आहे. तसेच प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहनही केले आहे. एक्स (पूर्व ट्विटर) वर पंतप्रधान मोदींनी नागरिकांना नमो ॲपद्वारे ‘राष्ट्र उभारणीसाठी देणगी’ देत या मोहिमेचा भाग होण्याचे आवाहन केले. पंतप्रधांनी पोस्टमध्ये लिहिले की, “@BJP4India मध्ये योगदान देताना आणि विकसित भारत तयार करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ देताना मला आनंद होत आहे. NaMoApp द्वारे #DonationForNationBuilding चा भाग होण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो!”, PM मोदींनी पक्षाला दिलेल्या देणगीच्या पावतीसह ही पोस्ट केली आहे.
भाजपाची देणगी मोहीम
प्राप्त माहितीनुसार, भाजपच्या देणगी गोळा करण्याच्या मोहिमेची सुरुवात १ मार्च रोजी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली होती, त्यावेळेस स्वतः नड्डा यांनी पक्षाला एक हजार रुपयांचे योगदान दिले होते. नड्डा यांनी X वर माहिती शेअर करत लिहिले होते की, “भारताला ‘विकसित भारत’ बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पनांना माझा वैयक्तिक पाठिंबा देण्याचे वचन घेत मी भाजपला देणगी दिली आहे. आपण सर्वजण पुढे येऊ आणि ‘राष्ट्र उभारणीसाठी देणगी’ देत या मध्ये सामील होऊ या. नमो ॲपचा वापर करून उभारूया जन आंदोलन”.
नरेंद्र मोदी पोस्ट
जे पी नड्डा पोस्ट
भाजप व काँग्रेसने किती देणगी मिळवली?
उल्लेखनीय बाब म्हणजे, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की भाजपने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ७१९ कोटी रुपयांचा निधी गोळा केला, जो मागील वर्षाच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे. २०२१ -२०२२ मध्ये पक्षाने ६१४ कोटी रुपयांचा निधी देणगीच्या माध्यमातून गोळा केला होता. दुसरीकडे, काँग्रेसने गोळा केलेल्या निधीमध्ये १६ कोटी रुपयांची घट झाली आहे. २०२१ – २०२२ या आर्थिक वर्षात काँग्रेसने ९५.४ कोटी रुपये जमा केले होते तर वर्ष २०२२-२३ मध्ये काँग्रेसने ७९ कोटी रुपयांचा निधी गोळा केला होता.
हे ही वाचा<< काँग्रेसचा खर्च जास्त, तर भाजपा श्रीमंत! २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय पक्षांनी किती कोटी कमावले? पाहा आकडेवारी
देणगी द्या, करामध्ये सूट मिळवा
विशेष म्हणजे आयकर कायदा, १९६१ नुसार सर्व राजकीय देणग्यांसाठी कंपन्यांना 80GGB अंतर्गत आयकरावर आणि इतरांसाठी 80 GGC अंतर्गत प्राप्तिकरावर सूट देण्यात आली आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने, निवडणूक रोखे रद्द केल्यावर भाजपाची ही देणग्यांसाठीची मोहीम सुरु झाली आहे. आकडेवारीनुसार भाजपाच्या एकूण मिळकतीच्या अर्ध्याहून अधिक योगदान हे निवडणूक रोख्यांचे आहे.