PM Modi Manipur Visit : मणिपूरमध्ये वांशिक संघर्ष उफाळून आल्यानंतर पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदी चुराचंदपूरसह अनेक ठिकाणी भेट देत आहेत. तसेच चुराचंदपूर आणि इम्फाळ येथील विस्थापितांची भेट देखील ते घेत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा मणिपूरसाठी महत्वाचा मानला जात आहे. या बरोबरच या दौऱ्यात मोदींच्या हस्ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील पार पडत आहे.
या दौऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी मणिपूरकरांना शांततेचं आवाहन केलं आहे. मणिपूरमधील सर्व गटांना हिंसाचार सोडून भावी पिढ्यांच्या हितासाठी शांततेच्या मार्गावर येण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं. मणिपूरच्या नावात ‘मणि’ आहे. ती ‘मणि’ भविष्यात संपूर्ण ईशान्येला चमकवणार असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी शांतता स्वीकारणं हा एकमेव मार्ग आहे. मणिपूर ही आशा आणि आकांक्षांची भूमी आहे. पण दुर्दैवानेया सुंदर प्रदेशात हिंसाचाराच्या घटना घडल्या. मी आता काही बाधित झालेल्या नागरिकांना भेटलो आणि त्यांना भेटल्यानंतर मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की मणिपूरमध्ये आशा आणि विश्वासाची एक नवीन पहाट उगवत आहे”, असं मोदींनी म्हटलं.
“मी सर्व संघटनांना शांततेच्या मार्गाने पुढे जाण्याचं आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचं आवाहन करतो. आज मी तुम्हाला वचन देतो की मी तुमच्याबरोबर आहे. भारत सरकार तुमच्यासोबत, मणिपूरच्या लोकांसोबत आहे. मणिपूरमध्ये जीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ज्या कुटुंबांनी आपली घरे गमावली त्यांच्यासाठी आमचं सरकार ७,००० नवीन घरे बांधण्यास आम्ही मदत करत आहोत”, असंही आश्वासन मोदींनी यावेळी दिलं आहे.
#WATCH | Churachandpur, Manipur: Prime Minister Narendra Modi says, "I would appeal to all organisations to move forward on the path of peace and fulfil their dreams. Today, I promise you that I am with you, the Government of India is with you, the people of Manipur. The… pic.twitter.com/zTvm4GJ1oq
— ANI (@ANI) September 13, 2025
“२०१४ पासून आम्ही मणिपूरमध्ये रस्ते आणि रेल्वेसाठीच्या बजेटमध्ये सातत्याने वाढ केली. अलिकडच्या काळात राष्ट्रीय महामार्गांवर ३,७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ८,७०० कोटी रुपये नवीन महामार्गांसाठी वापरले जात आहेत. २२,००० कोटी रुपयांचा जिरीबाम-इम्फाळ रेल्वे मार्ग लवकरच राज्याची राजधानी राष्ट्रीय नेटवर्कशी जोडली जाईल”, असंही मोदींनी सांगितलं.
विस्थापितांसाठी विशेष पॅकेजची घोषणा
पंतप्रधान मोदींनी मणिपूरसाठी ३,००० कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलं. त्यामध्ये हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्यांना मदत करण्यासाठी ५०० कोटी रुपये समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं की, “घरे गमावलेल्या कुटुंबांसाठी सरकार ७,००० नवीन घरे बांधण्यास मदत करत आहे आणि योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी प्राधान्य देत आहे.”