पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विद्यापीठात राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवी परीक्षा (एमए) उत्तीर्ण असून त्यांना त्यामध्ये प्रथम श्रेणी (फर्स्ट क्‍लास) मिळाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तापत्राने दिले आहे.
मोदींवर सातत्याने टीका करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती आयुक्त श्रीधर आचार्यलु यांच्याकडे मोदींची शैक्षणिक माहिती उघड करण्याची विनंती केली होती. या पार्श्‍वभूमीवर अहमदाबाद येथील एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात मोदी यांची शैक्षणिक कारकिर्द चांगली असल्याचे म्हणत राज्यशास्त्राच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाल्याचा दावा केला आहे. गुजरात विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार १९८३ साली पॉलिटिकल सायन्समधून एमए करताना मोदींनी ६२.३ टक्के गुण मिळवले. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात त्यांना युरोपियन राजकारण, भारतीय राजकारण विश्लेषण, राजकारणाचे मानसशास्त्र हे विषय होते. पंतप्रधानांनी ग्रॅज्युएशन कुठून केले त्याची विद्यापीठाकडे कोणतीही माहिती नाही.  गुजरात विद्यापीठाचे कुलगुरु एम एन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच्या पहिल्या वर्षाला मोदींना ४०० पैकी २३७ गुण मिळाले आणि दुस-या वर्षाला २६२ गुण मिळाले. त्यांना ८०० पैकी एकूण ४९९ गुण मिळाले.
दरम्यान मोदी यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार त्यांनी दिल्ली विद्यापीठातून १९७८ साली कला शाखेतील पदवी प्राप्त केली आहे.