इटानगर : अवघड असणारी विकासकामे सोडून देण्याची काँग्रेसची अंगभूत सवय होती, त्यामुळे ईशान्य भारताचे लक्षणीय नुकसान झाले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. अरुणाचल प्रदेशमधील कोट्यवधींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर इटानगर येथील इंदिरा गांधी पार्क येथे आयोजित सभेमध्ये मोदी बोलत होते.
यावेळी बोलताना मोदी यांनी ‘जीएसटी’ सुधारणांची प्रशंसा केली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दरकपात केल्यामुळे सणासुदीला जनतेला दुहेरी लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मोदी म्हणाले की, दिल्लीमधून ईशान्य भारताचा विकास करता येत नाही हे माहीत आहे. त्यामुळे आपण मंत्री आणि अधिकाऱ्यांना वारंवार या भागात पाठवत असतो. आपण स्वतः ईशान्येकडील राज्यांमध्ये ७०पेक्षा जास्त वेळा आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
अरुणाचल प्रदेशात लोकसभेच्या दोनच जागा असल्यामुळे काँग्रेसने या राज्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप पंतप्रधानांनी केला. यावेळी काँग्रेसला लक्ष्य करताना मोदी म्हणाले की, “काँग्रेसची एक अंगभूत सवय अशी आहे की ते अवघड असणाऱ्या विकासकामांना कधीही हात लावत नाहीत, ते तसेच सोडून देतात. काँग्रेसच्या या सवयीमुळे अरुणाचल प्रदेश आणि संपूर्ण ईशान्य भारताचे लक्षणीय नुकसान झाले आहे. या डोंगरदऱ्यांच्या आणि जंगलभागामध्ये विकासकाम करणे आव्हानात्मक असल्याने, काँग्रेस त्या भागाला मागास जाहीर करत असे आणि नंतर तो विसरून जात असे.” आपल्या कार्यकाळात अरुणाचल प्रदेशचा विकास झाला असून राज्य प्रगती करत असल्याचा दावा त्यांनी केला.
सेला बोगद्याची कोणी कल्पना केली नव्हती, तो आज अरुणाचलची अभिमानास्पद ओळख झाला आहे. होलोंगी विमानतळाला नवीन टर्मिनल मिळाले आहे आणि आता थेट दिल्लीला विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थी, पर्यटक आणि शेतकऱ्यांसाठी प्रवास सुलभ झाला आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
५,१०० कोटींचे प्रकल्प
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी अरुणाचल प्रदेशातील ५ हजार १२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. इटानगर येथील कार्यक्रमातून त्यांनी दूरदृश्य प्रणालीने शी योमी जिल्ह्यात दोन जलविद्युत प्रकल्पांची आणि तवांगमध्ये एका संकुल केंद्राची पायाभरणी केली. त्याशिवाय त्यांनी दळणवळण, आरोग्य आणि अग्निसुरक्षेच्या क्षेत्रांमधील विविध पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन केले.