विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे नेते भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना तसेच घुसखोरांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील दौऱ्यात शुक्रवारी केली. राज्यासाठी तेरा हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले. बिहारमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होईल.
कारागृहातून सरकार चालविण्याचे प्रकार घडत आहेत. तुरुंगातून फाइलवर सह्या केल्या जातात असा आरोप करत अप्रत्यक्ष दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले. केंद्र सरकारने या आठवड्यात संसदेत जे १३० वी घटनादुस्ती विधेयक सादर करण्यात आले त्याचा संदर्भ पंतप्रधानांनी भाषणात दिला. आपल्या ११ वर्षांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, हे गेल्या सरकारच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेत वेगळे चित्र आहे असा टोलाही लगावला. राज्यात सत्तेत असताना राष्ट्रीय जनता दल आणि भ्रष्टाचार याचे नाते सामान्यांनाही माहीत आहे अशी टीका पंतप्रधानांनी गयाजी येथील सभेत केली. त्यामुळेच आम्ही याबाबत कायदा करण्याचे ठरविले आहे. या कायद्याने भ्रष्ट मुख्यमंत्रीच नव्हे तर पंतप्रधानाला कारागृहात तीस दिवस घालविल्यास पद सोडावे लागेल अशी तरतूद आहे. आम्ही असा कठोर कायदा आणल्यावर काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल तसेच डाव्या पक्षांचा थयथयाट सुरू आहे असा आरोप पंतप्रधानांनी केला. त्यांना शिक्षेची भीती वाटते असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला. गयाजी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी खुल्या वाहनातून दाखल झाले. त्यांच्या समवेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार तसेच उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे होते.
घुसखोरीच्या मुद्द्यावरून टीका
घुसखोरांमुळे असणाऱ्या धोक्याचा मुद्दा स्वातंत्र्यदिनीही उपस्थित केला होता हे नमूद करत बिहारमधील मतदार याद्यांच्या तपासणीचा अप्रत्यक्ष संदर्भ पंतप्रधानांनी दिला. घुसखोरांना देशातील सुविधांचा फायदा मिळता कामा नये. यासाठीच आपण विशेष मोहिमेची घोषणा केली आहे. परंतु काँग्रेस आणि राजद त्यांच्या मतपेढीच्या राजकारणासाठी या घुसखोरांना वाचवू इच्छितात, असा आरोप मोदींनी केला. काँग्रेस बिहारबाबत संवेदनशील नाही असा आरोपही पंतप्रधानांनी केला.