PM modi speaks to CJI B R Gavai : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सोमवारी राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीश बीआर गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या खळबळजनक घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीजेआय गवई यांच्याशी फोनवरून चर्चा केली. भगवान विष्णू यांच्याबद्दल गवई यांनी केलेल्या वक्तव्यावरून हा प्रसंग उद्भवला होता. दरम्यान या घटनेनंतर राजकीय वर्तुळातुन याबद्दल प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले? .

पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करून न्यायमूर्ती गवई यांच्याबरोबर झालेल्या चर्चेसंबंधी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “भारताचे सरन्यायाधीश, न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्याशी बोललो. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय संतापला आहे. अशा निंदनीय कृत्यांना आपल्या समाजात कोणतेही स्थान नाही. हे पूर्णपणे निषेधार्ह आहे.”

“अशा परिस्थितीतही न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या शांतपणाचे मी कौतुक केले. यातून त्यांची न्यायाच्या मूल्यांप्रती आणि आपल्या संविधानाचा आत्मा बळकट करण्यासाठी त्यांची वचनबद्धता अधोरेखित होते,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नेमकं काय झालं?

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एक सत्तरीतील वकील सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतरही गवई यांनी संयम राखला आणि न्यायालयात उपस्थित वकिलांना त्यांचा युक्तीवाद सुरू ठेवण्याचे आवाहन केले. सरन्यायाधीश यावेळी म्हणाले, “हे सगळं पाहून कोणीही विचलित होऊ नका. मी देखील विचलित झालो नाही. अशा घटनांनी मला काहीच फरक पडत नाही.”

नेमकं प्रकरण काय आहे?

मध्य प्रदेशातील खजुराहो येथे असलेल्या जवारी मंदिरातील भग्नावस्थेतील सात फूट उंच भगवान विष्णूची मूर्ती पुनर्निर्मित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश म्हणाले, “जर तुम्ही खरे विष्णूभक्त असाल तर प्रार्थना करा, ध्यानधारणा करा. खजुराहोतील मंदिरे ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या अखत्यारीत येतात. तिथल्या मूर्ती बदलणे किंवा नवी स्थापित करणे हे एएसआयच्या नियमांनुसार मान्य होईल का, हा स्वतंत्र विषय आहे.” यानंतर सरन्यायाधीशांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली गेली होती.