पतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मंगळवारी (१३ फेब्रुवारी – दौऱ्याचा पहिला दिवस) अबू धाबी येथील शेख जायद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर यूएईमधल्या भारतीयांशी संवाद साधला. तर, बुधवारी ते अबू धाबी येथील BAPS हिंदू मंदिराचं उद्घाटन करणार आहेत. BAPS मंदिर हे संयुक्त अरब अमिरातीमधील राजधानीच्या अबू मुरेखाह शेजारील पहिले हिंदू मंदिर आहे. UAE मधील दुबईमध्ये इतर तीन हिंदू मंदिरे आहेत. दगडी वास्तुकलेने तयार करण्यात आलेले BAPS मंदिर आखाती प्रदेशातील सर्वांत मोठे मंदिर ठरणार आहे. दरम्यान, आज मोदी यांनी शेख जायद स्टेडियमवर भारतीयांना संबोधित करताना या मंदिराबाबतचा एक किस्सा सांगितला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Ahlan Modi या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले, मी तुम्हाला २०१५ मधला एक किस्सा सांगणार आहे. तेव्हा मी यूएईचे राजे नाहयान यांच्यासमोर माझ्या मनातली एक इच्छा प्रकट केली होती. मी तमाम भारतीयांच्या आणि हिंदूंच्या वतीने त्यांच्यासमोर अबू धाबी येथे एक मंदिर बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. माझ्या त्या प्रस्तावाला नाहयान यांनी एका क्षणात होकार दिला. ते एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी होकार तर दिलाच आणि म्हणाले अबू धाबीमध्ये तुम्ही ज्या जमीनीवर रेघ ओढाल ती जमीन आम्ही मंदिरासाठी देऊ. आता अबू धाबीतल्या त्या भव्य मंदिराच्या लोकार्पणाची वेळ आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मला माझा २०१५ मधील पहिला यूएई दौरा लख्ख आठवतोय. मी पंतप्रधान होऊन अवघे काहीच महिने झाले होते. तब्बल तीन दशकांनंतर भारताचा एखादा पंतप्रधान यूएई दौऱ्यावर आला होता. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचं जग तेव्हा माझ्यासाठी नवं होतं. तेव्हा विमानतळावर यूएईचे तत्कालीन युवराज आणि सध्याच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या पाच भावांसह माझं स्वागत केलं होतं. त्यांच्या डोळ्यात तेव्हा पाहिलेली चमक मी कधीच विसरू शकणार नाही. ते केवळ माझं एकट्याचं स्वागत नव्हतं. तर, १४० कोटी भारतीयांचं स्वागत होतं.

हे ही वाचा >> “मोदींनी नव्हे, कतारमधील भारतीयांना शाहरुखने सोडवलं”, भाजपा नेत्याचा दावा; किंग खानच्या कार्यालयाने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या भेटीदरम्यान यूए ने अबुधाबीमध्ये मंदिर बांधण्यासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला. ३४ वर्षांत इंदिरा गांधींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महत्त्वाच्या आखाती देशाला भेट दिली. त्यामुळे पंतप्रधानांची भेट राजनैतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात होती. पंतप्रधानांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि डिसेंबर २०१९ मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले. मंदिराचा अभिषेक सोहळा १४ फेब्रुवारी २०२४ रोजी नियोजित आहे, जो पवित्र वसंत पंचमीच्या दिवशी आहे.