देशातील लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे संपले असून एक्झिट पोल्सही जाहीर झाले आहेत. एक्झिट पोल्सनुसार एनडीए सरकारला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलमुळे चार जूनची धाकधुकही आता वाढली आहे. एकीकडे निकालाची उत्सुकता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आज विविध बैठकांमध्ये व्यस्त असणार आहेत. विविध विषयांवर चर्चा करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सात बैठका घेणार आहेत. या बैठकांमध्ये नवीन सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यसूचीचा आढावा घेण्यात येणार असल्याचंही वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी “विविध विषयांवर” सात सभा घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकांमध्ये नवीन सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यसूचीचा आढावा घेण्यासाठी विचारमंथन सत्र आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी बैठक समाविष्ट असेल.
“ईशान्यकडील राज्यांमध्ये आलेल्या चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर, ते देशातील उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतील,” असे सरकारमधील एका सूत्राने सांगितले.
कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ४५ तासांच्या ध्यानधारणेतून परतल्यानंतर पंतप्रधान मोदी दिवसभरात मॅरेथॉन बैठका घेणार आहेत. “५ जून रोजी मोठ्या प्रमाणावर जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी एक बैठकही घेणार आहेत. त्यानंतर नवीन सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यसूचीचा आढावा घेण्यासाठी ते एक दीर्घ विचारमंथन सत्र आयोजित करतील”, असंही सूत्राने सांगितले.
एक्झिट पोलमध्ये भाजपाला दणदणीत यश
भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)ला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्ता कायम ठेवेल असा अंदाज शनिवारी सर्व प्रमुख एक्झिट पोलने वर्तवला आहे. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष पुन्हा एकदा ३०० जागांचा आकडा पार करतील अशी अपेक्षा आहे. दहा एक्झिट पोलनुसार भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए किमान ३५० जागा जिंकेल, परंतु ४०० जागांचा आकडा पार करू शकणार नाही. तथापि, तीन एक्झिट पोलने एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदान शनिवारी संपले आणि देशव्यापी मतमोजणीचा भाग म्हणून मंगळवारी, ४ मे रोजी निकाल जाहीर होतील.