नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी ‘रोजगार मेळाव्या’चे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमात ७५ हजार युवकांना नोकरीचे नियुक्ती पत्र दिले जाणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. या मेळाव्यामधून १० लाख लोकांना रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व मंत्रालये आणि सरकारी खात्यांमधील मनुष्यबळाच्या स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश जून महिन्यात पंतप्रधानांनी दिले होते. ही प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याअंतर्गत पदभरती केली जाणार आहे. ही भरती मंत्रालयांकडून थेट किंवा यूपीएससी, एएसी, रेल्वे रिक्रूव्हमेंट बोर्ड आदी संस्थांमार्फत केली जाणार आहे. भरती प्रक्रिया

जलद करण्यासाठी निवडप्रक्रिया सुलभ करण्यात आल्याचेही पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

देशातील बेरोजगारीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधक केंद्र सरकारला लक्ष्य करत असताना ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. या मेळाव्याचा भाजपला प्रचारामध्ये उपयोग होईल, असे मानले जात आहे.

मिशन लाइफअभियानास आरंभ

केवाडिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एन्टोनियो गुटेरेस यांनी गुरुवारी गुजरातमधील केवाडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’मध्ये ‘मिशन लाइफ’ अभियानाची सुरुवात केली. या अभियानाचे विविध देशांच्या प्रमुखांनी कौतुक केले आहे. हवामान बदलाच्या विनाशकारी परिणामांपासून पृथ्वीला वाचवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली ही जागतिक कृती योजना आहे.

‘मिशन लाइफ’साठी (लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट) लोगो आणि टॅगलाइनचेही मोदी आणि गुटेरेस यांनी उद्घाटन केले. ‘‘मिशन लाइफ या योजनेसाठी जगातील अनेक देश पुढे येत आहेत. ही योजना आपल्याला पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणा देते. आपली जीवनशैली बदलून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. भारत हवामान बदलाच्या धोक्याचा सामाना करण्यासाठी वचनबद्ध आहे,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सांगितले.

‘‘आज हिमनद्या वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे, नद्या कोरडय़ा पडत आहेत, हवामान अनिश्चित होत आहे. हे बदल लोकांना असा विचार करण्यास भाग पाडत आहेत की, हवामानातील बदल केवळ धोरणावर सोडले जाऊ शकत नाहीत. वसुंधरेच्या रक्षणाची जबाबदारी आपली सर्वाची आहे,’’ असे मोदी यांनी या वेळी सांगितले.

कोणती पदे भरणार?

या मेळाव्यात ३८ मंत्रालये आणि खात्यांमधील गट अ आणि ब (राजपत्रित), गट ब (बिगर राजपत्रित) आणि गट क अशा तिन्ही गटांमधील पदे भरण्यात येतील. संरक्षण दल, उपनिरीक्षक, हवालदार, कारकून, स्टेनो, साहाय्यक, आयकर निरीक्षक आदी पदे भरली जाणार आहेत.