Pm Modi Uk Visit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात आज (२४ जुलै) द्विपक्षीय चर्चा पार पडली आहे. या चर्चेनंतर भारत आणि ब्रिटन दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारामुळे तब्बल व्यापार ३४ अब्ज डॉलर्सने वाढण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटनच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या एका पत्रकार परिषदेतील एका हलक्याफुलक्या क्षणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. पत्रकार परिषदेत अनुवादकाला हिंदीत बोलताना काही अडचणी येत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, हे लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे देखील आश्चर्यचकीत झाल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं?
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत सुरू होती. यावेळी अनुवादक हिंदीत संवाद साधत असताना काहीशी अडचण येत होती. मात्र, यानंतर पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप केला आणि म्हणाले की, “काळजी करू नका, इंग्रजी चालेल.” पंतप्रधान मोदींचं हे उत्तर ऐकून ब्रिटनचे पंतप्रधानही हसले. त्यानंतर कीर स्टार्मर यांनी खास त्यांच्या शैलीत दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर म्हणाले की, “मला वाटतं की आपण एकमेकांना चांगलं समजतो.” त्यांच्या या उत्तरामुळे भारत आणि ब्रिटनमधील ऐतिहासिक व्यापार करारावरील स्वाक्षरी झाल्यानंतर दोन्ही देशातील सौहार्दपूर्ण मैत्रीची एक अनपेक्षित झलक या माध्यमातून दिसून आली. या संयुक्त पत्रकार परिषदेतील या प्रसंगाची व्हिडीओची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH | "Don't bother, we can use English words in between. Don't worry about it," says PM Narendra Modi candidly as translations for questions and answers were made at their press statement and the journalists' questions that followed.
— ANI (@ANI) July 24, 2025
"I think we understand each other well,"… pic.twitter.com/VUe2wqQllG
भारत-ब्रिटन दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावेळी भारत व ब्रिटनमध्ये एक ऐतिहासिक व्यापार करार संपन्न झाला. दोन्ही देशाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत भारताचे वाणिज्य मंत्री पीयुष गोयल आणि ब्रिटनचे व्यवसाय व व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्यात हा करार पार पडला. दोन्ही नेत्यांनी या व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे उभय देशांमधील व्यापार ३४ अब्ज डॉलर्सने वाढण्याची अपेक्षा आहे.
या ऐतिहासिक करारानंतर पंतप्रधान मोदी व कीर स्टार्मर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्टार्मर म्हणाले, “या कराराचा भारत व ब्रिटन या दोन्ही देशांना फायदा होईल. या करारामुळे दोन्ही देशांचं उत्पन्न वाढेल, लोकांचं राहणीमान उंचावेल, नोकरदारांच्या खिशातील पैसे वाढतील, उभय देशांमध्ये अधिक नोकऱ्या निर्माण होतील. व्यावसायासाठीचं वातावरण अधिक उत्तम होईल. यामुळे वस्तूंवरील कर कमी होईल, व्यापार अजून सुलभ होईल.”
पाठोपाठ स्टार्मर यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “हा खूप महत्त्वाचा करार असून यामुळे यूकेमध्ये नव्या नोकऱ्या निर्माण होतील, व्यवासाच्या संधी वाढतील. तसेच आपल्या देशात होणारी गुंतवणूक वाढेल. या काराराशी संबंधित आम्ही एक कृतीशील आराखडा तयार केला आहे.”