PM Modis Mother AI video by Bihar Congress : बिहार विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्यामुळे बिहारमध्ये चांगलंच राजकारण तापलं आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या आईचा उल्लेख झाला आहे.

बिहार काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मातोश्रींचा एआयवर तयार केलेला व्हिडीओ शेअर करण्यात आल्याने राजकारण तापलं आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वप्नात त्यांची आई त्यांच्यावर ओरडताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर भाजपाने काँग्रेसवर टीका केली असून अशा व्हिडीओमुळे काँग्रेसने खालचा स्तर गाठल्याचं म्हटलं आहे. तसेच सदर व्हिडीओ कुणाचाही अनादर करण्यासाठी तयार केलेला नसल्याचं काँग्रेसने म्हटलं.

या AI व्हिडीओ बनवल्याच्या प्रकरणी आता काँग्रेसविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडीओ बनवून बिहार काँग्रेस युनिटने त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी शनिवारी एफआयआर नोंदवल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

वृत्तानुसार, भाजपाचे पदाधिकारी संकेत गुप्ता यांनी शुक्रवारी नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत आरोप केला की, या व्हिडिओने पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. कायदा, नैतिकता आणि महिलांच्या प्रतिष्ठेचं उल्लंघन केलं आहे. ही क्लिप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बिहार युनिटच्या अधिकृत एक्स हँडलवर १० सप्टेंबर रोजी पोस्ट करण्यात आली होती, असं तक्रारीत म्हटलं.

व्हिडीओमध्ये काय आहे?

बिहार काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ३६ सेकंदाचा एआयने तयार केलेला व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात पंतप्रधान मोदी म्हणतात, “आजची मतदान चोरी झाली. आता झोपायला जातो.” यानंतर पंतप्रधान मोदींच्या स्वप्नात त्यांच्या मातोश्री दाखविल्या गेल्या. त्या म्हणतात, “तू नोटबंदीनंतर मला रांगेत उभे केलेस. माझे पाय धुण्याचे रिल बनवलेस आणि आता बिहारमध्ये माझ्या नावावर राजकारण करत आहेस. तू माझ्या अवमानाचे बॅनर लावत आहेस, पोस्टर छापत आहेस. तू पुन्हा बिहारमध्ये नाटक करत आहेस. राजकारणाच्या नावावर किती खाली पडशील.” यानंतर पंतप्रधान मोदी झोपेतून दचकून उठताना दाखवले गेले आहे.

भाजपाचे प्रवक्ते शहजात पूनावाला यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, बिहार काँग्रेसने अतिशय घृणास्पद प्रकार केला असून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा पक्ष आता गांधीवादी नसून गल्लीवादी बनला आहे. ‘महिला, मातृशक्ती का अपमान, यही काँग्रेस की पेहचान’, अशी हिंदीतील घोषणाही त्यांनी दिली. आधी बिहारला बिडीशी जोडून आणि आता दिवंगत व्यक्तीला अपमानित करून काँग्रेसने लाजिरवाणे कृत्य केल्याचं त्यांनी म्हटलं.