जम्मू-काश्मिरमधील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात येथील जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदान केले. त्यामुळे लोकांना बंदुकीचा धाक दाखवून घाबरवता येईल असा समज असणारे दहशतवादी वैफल्यग्रस्त झाले असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. उधमपूर येथे दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या सभेत मोदी बोलत होते. गुरूवारी अर्निया या सीमावर्ती भागात करण्यात आलेला हल्ला दहशतवाद्यांच्या याच वैफल्यग्रस्त कृतीचे प्रतीक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
दहशतवादी कारवायांना मतदानाच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर दिल्याबद्दल मोदींनी काश्मिरी जनतेचे आभार मानले. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदान करून बंदुकीच्या गोळीपेक्षा मतदानाच्या पेटीची ताकद अधिक असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे भारतात लोकशाहीची पाळेमुळे किती खोलवर रूजली आहेत याचा प्रत्यय जगाला येईल. हा जम्मू-काश्मिरमधील लोकशाहीचा विजय असून, याबद्दल संपूर्ण देश काश्मिरी जनतेचा आभारी राहील, असे मोदींनी सांगितले. काश्मिरमधील राज्यकर्त्यांनी आजपर्यंत जनतेची केवळ लूट केली आहे. यामधील पै अन पै जनतेला परत हवा असेल तर राज्यात पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार आणा, असे आवाहन यावेळी मोदींनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2014 रोजी प्रकाशित
काश्मिरमधील हल्ला दहशतवाद्यांच्या वैफल्यग्रस्त कृतीचे प्रतिक- मोदी
जम्मू-काश्मिरमधील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात येथील जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदान केले.

First published on: 28-11-2014 at 04:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi addresses rally in jk amid encounter in arnia says terrorists are frustrated