scorecardresearch

“आता वेळ आलीये की भाजपानं…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन!

मोदी म्हणतात, “आपण पाहातोय की मूळ मुदद्यावरून लोकांचं दुसरीकडेच लक्ष भरकटवणं हे काही पक्षांचं काम होऊन बसलं आहे. आपण…!”

pm narendra modi bjp
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाजपा पदाधिकाऱ्यांना आवाहन!

एकीकडे महाराष्ट्रात भोंगे, हनुमान चालीसा, नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना राष्ट्रीय स्तरावर गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडी सुरू झाल्या आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जयपूरमध्ये भाजपाच्या देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा पदाधिकाऱ्यांना पुढील २५ वर्षांच्या दृष्टीने पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, राजकीय पक्ष म्हणून लोकांसाठी काम करण्याचं देखील आवाहन केलं आहे.

या महिन्यातच केंद्रात एनडीए अर्थात भाजपाप्रणीत आघाडीचं सरकार येण्याला ८ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मोदी म्हणाले, “या महिन्यात भाजपाला केंद्रात ८ वर्ष पूर्ण झाले आहेत. ही वर्ष देशाची सेवा करण्याची होती. गरीबांच्या आणि मध्यम वर्गाच्या कल्याणासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी काम करण्याची होती. जनसंघच्या काळात देखील आपलं निवडणूक राजकारणात अस्तित्व अल्प होतं. पण तरी आपल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रउभारणीच्या कामात झोकून देऊन काम केलं”, असं मोदी यावेळी म्हणाले.

विरोधकांवर निशाणा

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही विरोधी पक्षांवर नाव न घेता निशाणा साधला. “आपण पाहातोय की मूळ मुदद्यावरून लोकांचं दुसरीकडेच लक्ष भरकटवणं हे काही पक्षांचं काम होऊन बसलं आहे. आपण त्यांच्या जाळ्यात न अडकता त्यांच्यापासून सावध राहायला हवं”, असं मोदी यावेळी म्हणाले आहेत.

“पुढील २५ वर्षांच्या दृष्टीने काम करा”

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील २५ वर्षांवर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं. “आपण आता पुढील २५ वर्षांसाठीचं उद्दिष्ट निश्चित करत आहोत. आता वेळ आली आहे की भाजपानं पुढील २५ वर्षांसाठीचं ध्येय निश्चित करायला हवं. हे ध्येय सर्व अडचणींवर मात करत सातत्याने देशाच्या नागरिकांसाठी काम करत राहाणं आणि त्यांच्या आकांक्षांची पूर्तता करणं हे असायला हवं”, असं मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi appeals bjp office bearers to target next 25 years pmw

ताज्या बातम्या