Iran President Called PM Modi: अमेरिकेचे इराणच्या अणु प्रकल्पांवरील हल्ले आणि मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणादरम्यान त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली आणि परिस्थिती बिघडत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
याबाबत एक्सवरील पोस्टमध्ये माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावेळी त्यांनी तणाव कमी करण्याचा, संवाद आणि राजनयिकतेद्वारे समस्या सोडवण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा व्यक्त केला. याचबरोबर प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित करण्यावर भर दिला.
अमेरिकेने इराणच्या अणु प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. हा फोन ४५ मिनिटे चालला, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षादरम्यान, आज अमेरिकेने इराणच्या फोर्डो, इस्फहान आणि नतान्झ अणु प्रकल्पांवर हल्ला केला आहे. इराणच्या अणुऊर्जा संघटनेने त्यांच्या तीन अणु प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी हा प्रकार आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराण आणि इस्रायलमधील युद्ध तीव्र झाले आहे. इराणने तेल अवीववर क्षेपणास्त्रे डागली आहेत आणि इस्रायलनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
तत्पूर्वी, इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अब्बास अराघची यांनी रविवारी इराणच्या अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले केल्याबद्दल अमेरिकेचा निषेध केला. अराघची यांनी याला आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांचे चार्टर आणि अण्वस्त्र अप्रसार कराराचे गंभीर उल्लंघन म्हटले आहे.
पाकिस्तानची प्रतिक्रिया
इराणवरील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांबद्दल पाकिस्ताननेही एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “इराणवरील अमेरिकेचा हल्ला हा सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे.” पाकिस्तानने असेही म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर अंतर्गत इराणला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निवेदनात म्हटले आहे की, “पश्चिम आशियातील तणाव वाढण्याच्या धोक्याबद्दल ते अत्यंत चिंतित आहेत. इराणविरुद्ध सुरू असलेली आक्रमकता अत्यंत त्रासदायक आहे. जर तणाव वाढला तर त्याचे या प्रदेशावर गंभीर परिणाम होतील.”