PM Narendra Modi on Manipur Women’s Violence : मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात घडली. त्यानंतर दोन महिने उलटूनही आरोपींना अटक झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सध्या या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर भाष्य केलं आहे. तसेच मणिपूरच्या मुलींबरोबर झालेला प्रकार कधीही माफ केला जाऊ शकत नाही, असं मत व्यक्त केलं.

नरेंद्र मोदी म्हणाले, “माझं मन दुःख आणि रागाने भरलं आहे. मणिपूरची जी घटना समोर आली ती कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद घटना आहे. हे पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे बाजूला ठेवा. मात्र, या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावलं आहे. १४० कोटी देशवासीयांना खाली पहावं लागत आहे.”

“आपल्या आई-बहिणींच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर पावलं उचलावीत”

“मी सर्व मुख्यमंत्र्यांना आग्रह करतो की, त्यांनी आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था मजबूत करावी. आपल्या आई-बहिणींच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर पावलं उचलावीत. घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो किंवा मणिपूरची असो, या देशात कोणत्याही भागात, कोणत्याही राज्यात राजकीय वादापलिकडे जाऊन कायदा सुव्यवस्था, महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, पोलीस म्हणाले, “या प्रकरणात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मणिपूरच्या मुलींबरोबर जे झालं ते कधीही माफ केलं जाऊ शकत नाही”

“मी देशवासीयांना विश्वास देऊ इच्छितो की, कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही. कायदा आपल्या पूर्ण शक्तीनिशी आणि कठोरपणे पावले उचलेल. मणिपूरच्या मुलींबरोबर जे झालं ते कधीही माफ केलं जाऊ शकत नाही,” असंही मोदींनी नमूद केलं.