अहमदाबाद : अहमदाबादमधील विमान दुर्घटनेने आपण सर्वजण दु:खी आहोत. इतक्या अचानक आणि हृदयद्रावक पद्धतीने इतके जीव गमावणे हे शब्दांच्या पलीकडे आहे. सर्व शोकाकुल कुटुंबांप्रति सहवेदना. आम्हाला त्यांचे दु:ख समजते आणि हेदेखील माहीत आहे की निर्माण झालेली पोकळी येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत जाणवेल, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी एअर इंडिया विमानाच्या अपघातस्थळाची पाहणी केली, त्याशिवाय सरकारी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. विमान रुग्णालयाच्या वसतिगृहावर कोसळल्यानंतर काही जण जखमी झाले होते. अपघातात बचावलेला विमानातील एकमेव प्रवासी विश्वासकुमार रमेश यांचीही भेट घेऊन पंतप्रधानांनी विचारपूस केली. या वेळी त्यांनी आपल्या भावना मांडल्या.
अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर पंतप्रधानांनी शुक्रवारी अहमदाबादचा दौरा केला. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर सकाळी पोहोचल्यानंतर मोदी थेट विमान अपघातस्थळी गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय विमान वाहतूकमंत्री किंजरापू राम मोहन नायडू आणि गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी पंतप्रधानांना विमान महाविद्यालयाचे वसतिगृह आणि भोजनकक्षावर कसे कोसळले याची माहिती दिली. पंतप्रधानांनी सुमारे २० मिनिटे घटनास्थळाची पाहणी केली.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधानांनी सरकारी रुग्णालयाला भेट दिली. विमान दुर्घटनेतील बचावलेला एकमेव प्रवासी विश्वासकुमार रमेश यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. पंतप्रधानांनी रुग्णालयाच्या सी-७ विभागाला भेट दिली, जिथे २५ जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींची विचारपूस करत त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला.
अहमदाबादमधील अपघातस्थळाला भेट दिली. शुक्रवारी झालेल्या या अपघाताचे दृश्य अतिशय भयावह आहे. तेथे बचावकार्य करणाऱ्या विविध पथकांशी चर्चा केली.या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल आमच्या संवेदना कायम आहेत.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पंतप्रधानांकडून विचारपूस
लंडनपासून सुमारे १४० किमी अंतरावर असलेल्या लेस्टर शहरातील रहिवासी असलेल्या आणि अपघातात बचावलेल्या एकमेव विश्वासकुमार रमेश यांच्यावर सध्या अहमदाबाद येथील ‘सिव्हिल’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली.
हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडले. मी कसा वाचलो यावर माझा विश्वासच बसत नाही… क्षणभर मला वाटले की मी मरणार आहे, पण जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी जिवंत होतो. मी स्वत:ला आसनावरून बाहेर काढले आणि एका उघड्या जागेतून बाहेर पडलो. – विश्वासकुमार रमेश, अपघातातील एकमेव बचावलेली व्यक्ती
रुपानी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कुटुंबीयांची शुक्रवारी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. ‘‘विजयभाई आपल्यात नाहीत हे अकल्पनीय आहे. मी त्यांना अनेक दशकांपासून ओळखतो. आम्ही कठीण काळातही खांद्याला खांदा लावून एकत्र काम केले,’’ असे मोदींनी ‘एक्स’वरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. विजयभाई नम्र आणि मेहनती होते, पक्षाच्या विचारसरणीशी दृढपणे वचनबद्ध होते. पदोन्नतीनंतर त्यांनी संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून परिश्रमपूर्वक काम केले, असे ते म्हणाले.
डोळ्यासमोर अनेकांना जीव सोडताना पाहिले
‘विमानाच्या ज्या आसनावर बसलो होतो, तो भाग कोसळल्यानंतर इतर प्रवाशांपेक्षा जमिनीच्या जवळ असल्याने जिवंत बाहेर पडणे शक्य झाले. परंतु, यावेळी आगीच्या ज्वालांमध्ये अनेकांना डोळ्यासमोर होरपळताना पाहिले,’ असा थरारक अनुभव अहमदाबाद विमान दुर्घटनेतील आश्चर्यकारकरीत्या बचावलेल्या ४० वर्षीय विश्वासकुमार रमेश यांनी शुक्रवारी सांगितला. मूळ गुजरातला लागून असलेल्या दीव शहरातील रहिवासी असलेल्या परंतु ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलेल्या रमेश यांनी दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझे आसन ११अ हे विमानाच्या डाव्या बाजूला असलेल्या आपत्कालीन दरवाजाजवळ होते. मी ज्या आसनावर बसलो होतो, तो भाग वसतिगृहाच्या आवारात तळमजल्यावर पडला. तेव्हा विमानाचा दरवाजा तुटलेला दिसला. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकतो, असे मी स्वत:शीच बोललो. प्रयत्न केल्यानंतर मी विमानातून बाहेर पडलो’. ‘ माझ्या डोळ्यांसमोर मी अनेक लोकांना जीव सोडताना पाहिले. मी या भीषण अपघातातून कसा बचावलो, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही.’
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
विमान दुर्घटनेच्या अपघात स्थळाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरात सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली. विमानतळाजवळील गुजसैल इमारतीत ही बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदींना गुरुवारी झालेल्या विमान अपघातानंतर घडलेल्या घटनांच्या मालिकेची माहिती देण्यात आली. पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपचे प्रमुख सी. आर. पाटील आणि नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू या बैठकीला उपस्थित होते.