पंतप्रधान मोदींचे गणित; अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्या हस्ते अहमदाबाद आणि मुंबईदरम्यानच्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी येथे झाले. या प्रकल्पाला जपानने ८८ हजार कोटी रुपये कर्ज केवळ ०.१ एक टक्के इतक्या कमी व्याजदराने दिले आहे. त्यामुळे एक प्रकारे बुलेट ट्रेन आपल्याला मोफतच मिळाली आहे असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी एक लाख दहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाने दोन शहरांमधील प्रवासाचे सध्याचे सात तासांचे अंतर तीन तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करता येणार आहे.

या पुर्वी बुलेट ट्रेनची जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा त्याची खिल्ली उडवली जायची. मात्र विरोधकच आता ही गरज असल्याचे सांगतात त्यावरूनच प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित  असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. जलदगतीने ठिकाणे जोडण्याचे आमचे ध्येय आहे, त्यातून आर्थिक विकास होईल असे पंतप्रधानांनी सांगितले. जपानने १६४ मध्ये बुलेट ट्रेन प्रकल्प पहिल्यांदा आणला आता हे तंत्रज्ञान पंधरा देशांमध्ये असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

आबे यांनी भाषणात मोदींचा उल्लेख जागतिक नेते असा केला. भारत व जपान यांची मैत्री खास अशी असून, दोन्ही देश बलवान असणे एकमेकांच्या हिताचे असल्याचे अबे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला रेल्वे मंत्री पीयूष गोयल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. बुलेट ट्रेनमुळे केवळ प्रवासाचे अंतरच कमी होणार नसून जनताही एकमेकांच्या जवळ येईल. ही ट्रेन पर्यावरणपूरक आहे तसेच त्यामुळे महसूलही मिळेल.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान काही वर्षांनी मी जेव्हा अहमदाबादला येईन तेव्हा मोदींबरोबर बुलेट ट्रेनमधून प्रवास करेन. मोदींनी दोन वर्षांपूर्वी देशात बुलेट ट्रेन आणण्याचा निर्णय दूरदर्शी होता.   शिंझो आबे, जपानचे पंतप्रधान

  • अहमदाबाद ते मुंबईदरम्यान धावणारी भारताची पहिली बुलेट ट्रेन ताशी कमाल साडेतीनशे किलोमीटरच्या वेगाने धावणार असून, ५०८ किलोमीटरचे हे अंतर तीन तासांहून कमी वेळेत पार करणार आहे. २०२२ पर्यंत ही गाडी प्रत्यक्षात धावण्याची अपेक्षा आहे.
  • या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १.१० लाख कोटी रुपये खर्च येणार असून, त्यासाठी जपान ८८ हजार कोटी रुपयांचे कर्ज ०.१ टक्का इतक्या अत्यल्प दराने देणार आहे.
  • ही अतिजलद गाडी सरासरी ताशी ३२० किलोमीटर आणि कमाल ताशी ३५० किलोमीटर वेगाने धावेल. मार्गात ही गाडी १२ रेल्वे स्थानकांवर थांबेल. बोइसर आणि मुंबईतील बीकेसीदरम्यान २१ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदला जाणार असून त्यापैकी ७ किलोमीटर पाण्याखालून राहील.
  • वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भडोच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद, साबरमती ही बुलेट ट्रेनची नियोजित स्थानके असतील
  • या रेल्वेमार्गापैकी ९२ टक्के मार्ग उन्नत (एलेव्हेटेड) राहणार असून ६ टक्के बोगद्यांमधून जाईल आणि फक्त २ टक्के मार्ग जमिनीवर राहणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी रेल्वेला फक्त ८२५ हेक्टर जमीन आवश्यक आहे.
  • दररोज सुमारे ७० फेऱ्यांसह बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावू लागेल तेव्हासुमारे ३५ बुलेट ट्रेन चालवण्याची रेल्वेची योजना आहे. ही संख्या २०५० सालापर्यंत १०५ गाडय़ांपर्यंत वाढवली जाईल.
  • सुरुवातीला या गाडीला १० डबे असतील व त्यातून एकूण ७५० प्रवाशांची प्रवास करण्याची क्षमता असेल.