अबूधाबीतील हिंदू मंदिर उभारणीच्या प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ओमानमधील शिवमंदिराला भेट दिली. मस्कतमधील हे शिवमंदिर सुमारे १०० वर्ष जुने असून मोतीश्वर मंदिर या नावाने हे मंदिर मस्कतमध्ये प्रसिद्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओमानमध्ये असून सोमवारी त्यांनी मस्कतमध्ये शिवमंदिराला भेट दिली. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे गुजरात कनेक्शन. कच्छमधील भाटिया समाजाने हे मंदिर बांधले आहे. हा समाज शेकडो वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त ओमानमध्ये स्थायिक झाला होता. १९९९ मध्ये या मंदिराचे जिर्णोद्धार करण्यात आले.

मस्कतमध्ये वाळवंट असला तरी या मंदिराच्या आतमध्ये विहीर आहे. या विहीरीत बारा महिने पाणी असते. महाशिवरात्रीच्या दिवशी सुमारे २० हजार हिंदू भाविक या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. या काळात मंदिराबाहेर दिवस- रात्र भाविकांची रांग असते. महाशिवरात्रीसह वसंत पंचमी, रामनवमी, हनुमान जंयती, श्रावण महिना आणि गणेश चतुर्थी असे विविध उत्सव देखील या मंदिरात साजरे केले जातात. मस्कतमधील हिंदूंना एकत्र आणण्यात या मंदिराने महत्त्वाची भूमिका निभावल्याचे स्थानिक सांगतात.  मंदिरात तीन पुजारी असून त्याच्या मदतीला तीन जण असतात. याशिवाय स्वयंसेवकांची फौजही मदतीला असते.सोमवारी मोदींनी या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिराबाहेर मोदींना पाहण्यासाठी भारतीयांनी गर्दी केली होती.

दरम्यान, रविवारी नरेंद्र मोदी ओमानमध्ये पोहोचले. रविवारी संध्याकाळी त्यांनी ओमानमधील सुलतान कुबूस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये आठ करारही झाले. सुरक्षा, आरोग्य, पर्यटन क्षेत्रांसंबंधीचे हे करार होते. यानंतर त्यांनी मस्कतमधील सुलतान कुबूस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. ओमानमधील तिन्ही भाषांमध्ये नमस्कार करत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. सरकारच्यावतीने एक राजदूत असतो. पण ओमानमध्ये भारताचे लाखो राजदूत आहेत, असे त्यांनी सांगितले. मी चहा वाला आहे. ९० पैशांमध्ये चहापण येत नाही. पण आम्ही विमा देत आहोत. मला जनतेने ज्या आशेने या पदावर बसवले आहे, त्यांचा अपेक्षांभग होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. भारत वेगाने प्रगती करत असून आगामी काळात तुम्हाला देशात काही बदलही दिसतील, असे त्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi in oman visit shiva temple in muscat know about motishwar mandir and its gujarat connection
First published on: 12-02-2018 at 13:47 IST