कार्यकर्त्याने किंवा कर्मचाऱ्याने एखाद्या नेत्याची चप्पल काढल्याचे किंवा चप्पल उचलून घेतल्याचे प्रकार बऱ्याचदा दिसतात.  नेतेमंडळीही अशा प्रकारांना विरोध करताना दिसत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी याला अपवाद ठरले आहेत. मोदींनी उत्तराखंड दौऱ्यादरम्यान एका कर्मचाऱ्याला चप्पल काढण्यापासून थांबवले आणि स्वतःच चप्पल काढली. त्यामुळे मोदींच्या उत्तराखंड दौऱ्यात या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी मोदी बाहेर थांबले होते. या दरम्यान एक कर्मचारी तिथे आला आणि तो मोदींच्या पायातील चप्पल काढण्यासाठी खाली वाकला. मात्र मोदींनी त्याला रोखले आणि मी स्वतःच हे काम करीन असे त्या कर्मचाऱ्याला सांगितले. ट्विटरवर एका युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मोदींच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. मोदींची चप्पल काढण्यासाठी आलेला कर्मचारी हा कोण होता हे अद्याप समजू शकलेले नाही. पण मोदींचा आदर्श अन्य नेत्यांनीही घ्यावा अशी प्रतिक्रिया अनेकजण व्यक्त करत आहे.

मंदिरातून दर्शन करुन बाहेर आल्यावर मोदींनी बाहेर जमलेल्या मंडळींशी हस्तांदोलन केले. तसेच यादरम्यान कडेवर लहान बाळाला घेऊन थांबलेल्या जवानाशीही त्यांनी संवाद साधला.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिरातील दर्शनाला आजपासून सुरुवात झाली .बर्फवृष्टीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले. पहिल्या दर्शनाचा मान पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आला असून मोदींनी मंदिरात रूद्राभिषेक करत पूजाअर्चा केली. यानंतर मोदींनी हरिद्वारमधील पतंजली संशोधन संस्थेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात मोदींनी स्वच्छ भारतसाठी आवाहन केले. ‘मी अस्वच्छता करणार नाही, असा संकल्प करा,’ असे आवाहन त्यांनी केले. तर रामदेव बाबा यांनी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रऋषी म्हणत त्यांचे कौतुक केले.