Ganesh Idols: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी, दिवाळी आणि गणेशोत्सव यांसारख्या सणांमध्ये भारतात बनवलेल्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आणि परदेशात निर्माण होणाऱ्या वस्तूंवरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आयात होणाऱ्या चिनी उत्पादनांवर अप्रत्यक्ष टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “गणेशमूर्ती देखील परदेशातून येतात. या लहान डोळ्यांच्या गणेशमूर्ती असतात, ज्यांचे डोळेही नीट उघडलेले नसतात.”
गुजरातमधील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपण गावातील व्यापाऱ्यांना अशी शपथ घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे की, कितीही नफा मिळाला तरी ते परदेशी वस्तू विकणार नाहीत.”
भारतीय बाजारपेठेत परदेशी आयातींचा ओघ वाढत असल्याची उदाहरणे देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “दुर्दैवाने, गणेशमूर्तीही परदेशातून येतात, लहान डोळ्यांच्या गणेशमूर्ती ज्यांचे डोळे नीट उघडतही नाहीत. होळीचे रंगही परदेशी बनावटीचे असतात.”
चीन भारतीय बाजारपेठेत स्वस्त वस्तूंची निर्यात वाढवत असल्याच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे विधान केले. सजावटीचे दिवे, फटाके, खेळणी आणि धार्मिक मूर्ती यासारख्या वस्तू, ज्या मोठ्या प्रमाणात चीनमधून कमी किमतीत आयात केल्या जातात, गेल्या वर्षांत भारतातील सण आणि उत्सवाच्या काळात चिनी वस्तूंचे वर्चस्व राहिले आहे. ज्यामुळे स्थानिक कारागीर आणि उत्पादकांवर परिणाम होत आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना आयात केलेल्या उत्पादनांच्या दैनंदिन वापराबद्दल आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. “एक नागरिक म्हणून, मी तुम्हाला एक काम सांगतो, घरी जा आणि २४ तासांत तुम्ही किती परदेशी उत्पादने वापरता याची यादी बनवा. तुम्हाला कळतही नाही पण वापरलेले केसांची पीन, कंगवा देखील परदेशी बनावटीचे आहेत,” असे ते म्हणाले.
यावेळी भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यामातून पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “जर आपल्याला भारत वाचवायचा असेल, भारत घडवायचा असेल, भारताचा विकास करायचा असेल, तर ऑपरेशन सिंदूर ही केवळ सशस्त्र दलांची जबाबदारी नाही, तर ती १४० कोटी नागरिकांची जबाबदारी आहे.”
“जेव्हा मी आपल्या सशस्त्र दलांच्या आणि नागरिकांच्या ताकदीबद्दल बोलतो तेव्हा, त्याचा अर्थ असा असतो की प्रत्येक नागरिकाने देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे. जर आपण सर्वांनी २०४७ पर्यंत विकसित भारत उभारण्यात योगदान दिले आणि आपली अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर नेण्यास मदत केली तर आपण परदेशी उत्पादनांवर अवलंबून राहणार नाही,” असे ते म्हणाले.