सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये वितुष्य निर्माण झाले आहे. सांगलीमध्ये शिवसेना उबाठाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली असून ही उमेदवारी रद्द व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर भिवंडीमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसने बंडाचे निशाण फडकवले आहे. या घडामोडींवर बोलत असताना संजय राऊत यांनी सांगलीत एका प्रचार सभेत बोलत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना नौटंकी बंद करण्याचा इशारा दिला.
काय म्हणाले संजय राऊत?
चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत असताना संजय राऊत म्हणाले, “सांगलीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हावे. अन्यथा सांगलीची जनता तुम्हाला माफ करणार नाही.” सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राऊत बोलत होते.
या मतदारसंघाला आर आर पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यांची परंपरा आहे, असे सांगून राऊत पुढे म्हणाले, त्यांच्याप्रमाणेच आता एक प्रामाणिक उमेदवार निवडणुकीसाठी उभा आहे. त्याची पाटी कोरी आहे. त्याच्यावर कोणताही कलंक नाही. तो इतरांसारखा घोटाळेबाज नाही. अशा माणसाच्या मागे उभे राहून बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली पाहिजे, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
‘आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय’, संजय राऊत यांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा
विश्वजीत कदम यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
काँग्रेसकडून विशाल पाटील आणि विश्वजीत कदम या दोन नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवाराचा विरोध केला आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला. त्यांनी आज कडेगाव तालुक्यातील स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. “स्वर्गीय पतंगराव कदम हे शून्यातून विश्व निर्माण करणारा, प्रतिभावंत, दिलदार मनाचा मोठा माणूस होता”, अशा शब्दात संजय राऊत यांनी पतंगराव कदम यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान समाधीस्थळी पोहोचण्या आधी गाडीतून प्रवास करत असताना संजय राऊत यांना माजी मंत्री विश्वजीत कदम यांचा फोन आला. फोनवर या दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले. याबाबतचा तपशील मात्र संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला नाही.