पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अर्धवट राहिलेला पंजाब दौरा आणि सुरक्षेत कसूर केल्याचा भाजपाचा आरोप या मुद्द्यांवरून आज दिवसभर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. एकीकडे भाजपाकडून पंजाब सरकारनं पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कसूर केली असून त्यावरून जोरदार टीका केली असताना दुसरीकडे पंजाब काँग्रेसकडून मात्र हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. केंद्रीय गृहविभागाने पंजाब सरकारकडून यासंदर्भात खुलासा मागवला आहे. त्यावर आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मोदींच्या जीवाला कोणताही धोका नव्हता, असं चरणजीतसिंग चन्नी म्हणाले आहेत.

“..म्हणून पंतप्रधानांचं स्वागत करायला गेलो नाही!”

मोदींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची टीका भाजपाकडून केली जात असताना हा दावा पंजाब काँग्रेसनं फेटाळून लावला आहे. “फिरोजपूर जिल्ह्यातून पंतप्रधानांना त्यांचा दौरा अर्धवट सोडून परत जावं लागलं याविषयी मी खेद व्यक्त करतो. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो. पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी मी भटिंडाला जाणं अपेक्षित होतं. पण माझ्यासोबत असलेल्यांपैकी काहीजण करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे मी पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी जाऊ शकलो नाही”, असं ते म्हणाले आहेत.

“पंतप्रधानांना दौरा रद्द करण्याबाबत कळवलं होतं”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना नियोजित पंजाब दौरा रद्द करण्यासंदर्भात पंजाब सरकारनं कळवलं होतं, असं चन्नी म्हणाले आहेत. “आम्ही पंतप्रधान कार्यालयाला कळवलं होतं की तुम्ही हा दौरा रद्द करावा. पंजाबमधील हवामान खराब होतं. त्यासोबतच शेतकरी आंदोलकांचा मुद्दा देखील अडचणीचा होता. मात्र, तरीदेखील ते दौऱ्यावर आले”, असं चन्नी म्हणाले.

मोदींच्या सुरक्षेत त्रुटी? पंजाब सरकारचं भाजपाला प्रत्युत्तर; मुख्यमंत्री चन्नी म्हणाले…!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणार नाही”

“त्यांनी अचाकन त्यांच्या मार्गामध्ये बदल केल्याची माहिती आमच्याकडे नव्हती. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. जर पंतप्रधानांच्या आजच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी असेल, तर आम्ही त्यासंदर्भात चौकशी करू. पंतप्रधानांच्या जीवाला कोणताही धोका नव्हता. शेतकरी गेल्या वर्षभरापासून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. मी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणार नाही. आम्ही काल रात्रभर आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी निदर्शनं थांबवली. पण आज अचानक काही आंदोलक फिरोजपूरमध्ये जमा झाले”, असं चरणजीस सिंग चन्नी यांनी स्पष्ट केलं आहे.