जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात गेट्स यांनी नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतल्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत बिल गेट्स आणि नरेंद्र मोदी यांनी भारतासह जगाचं भविष्य, औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती, नोकऱ्या, भारताची पुढील वाटचाल, डिजीटल क्षेत्रात भारताची कामगिरी, भारतासह जगभरातील देशांसमोरील आव्हानं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रदीर्घ चर्चा केली. या चर्चेवेळी बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारला की, एआयमुळे भारतात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, एआयमुळे नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. भारत ही आव्हानं कशी पेलणार? भारत या आव्हानांचा कशा पद्धतीने सामना करणार आहे. यावर मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्त्व, त्यामधून निर्माण होणाऱ्या नोकऱ्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर सविस्तर उत्तर दिलं. तसेच त्यांच्या डीपफेक व्हिडीओंचा दाखला देत ही आव्हानं कशी पेलता येतील यावर भाष्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हे खरं आहे की एआयने आपल्यासमोर अनेक आव्हानं निर्माण केली आहेत. एआय ही खूप चांगली गोष्ट आहे. पंरतु, उत्तम प्रशिक्षणाशिवाय अशी गोष्ट एखाद्याच्या हातात दिली तर त्या गोष्टीचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. मी एआयशी संबधित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांशी बोललो. त्यानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलोय की सुरुवातीच्या काळात तरी एआय जनरेटेड गोष्टींवर (एआयचा वापर करून तयार केलेली सामग्री, जसे की फोटो, व्हिडीओ, संगीत आणि डॉक्यूमेंट्स) वॉटरमार्क असायला हवा. ही सामग्री एआयच्या माध्यमातून बनवली असल्याचं लोकांना कळायला हवं. जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही. असं करणं काही वाईट नाही. ही गोष्ट केवळ एआय जनरेटेड आहे हे लोकांना सांगायलाच हवं. त्यामुळे त्या युजरला किंवा उपभोक्त्याला त्या गोष्टीची खरी किंमत कळेल.
हे ही वाचा >> अरुणाचलबाबत अमेरिका भारताच्या बाजूने, चीनचा जळफळाट; म्हणे, “अमेरिका आमच्यात भांडणं लावतेय!”
मोदी म्हणाले, डीपफेक हे एआयमुळे निर्माण झालेलं एक मोठं आव्हान आहे. भारतासारख्या लोकशाही असलेल्या इतक्या मोठ्या देशात हल्ली डीपफेक सामग्री बनवली जातेय. माझे डीपफेक व्हिडीओदेखील मी पाहिले आहेत. कोणीतरी माझ्या आवाजात एखादी घाणेरडी गोष्ट बनवली आणि समाजमाध्यमांवर शेअर केली तर सुरुवातीला लोकांना ते खरं वाटेल. त्यामुळे देशभरात मोठी आग लागेल, गदारोळ माजेल. त्यामुळे डीपफेक कॉन्टेंटचा मूळ सोर्स (डीपफेक सामग्रीचा मुख्य स्त्रोत) लोकांना समजला पाहिजे. अमुक-तमुक सामग्री एआयद्वारे बनवली आहे असं त्यावर लिहिलेलं असायला हवं. मला वाटतं की, कदाचित या गोष्टीची भविष्यात गरज पडणार नाही. परंतु, सध्या तरी आपण काळजी घेतली पाहिजे. एआयबद्दल किंवा डीपफेकबद्दल अमुक गोष्टी करायला हव्यात किंवा तमुक गोष्टी करू नयेत याची नियमावली तयार करायला हवी.