Congress Criticizes PM Narendra Modi’s Speech: स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा काँग्रेस पक्षाने खोटा असल्याचे म्हटले आहे. भारत छोडो आंदोलनादरम्यान संघाच्या नेत्यांनी ब्रिटिशांना मदत केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर म्हटले आहे की, “१९४२ मध्ये ब्रिटिशांविरुद्ध सुरू झालेल्या ‘भारत छोडो आंदोलना’दरम्यान जेव्हा संपूर्ण देश तुरुंगात जात होता, तेव्हा संघ ब्रिटिशांना ही चळवळ दडपण्यास मदत करत होता.”

काँग्रेसने एक्स पोस्टमध्ये पुढे असेही म्हटले की, “प्रत्येकाच्या ओठांवर आरएसएससाठी एकच नारा होता, जे देशभक्त होते ते युद्धात गेले, जे देशद्रोही होते ते संघात गेले.”

काँग्रेस पक्षाच्या मते, संघाने गेल्या १०० वर्षात एकही काम केलेले नाही ज्यामुळे देशाला कोणत्याही प्रकारे फायदा झाला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी वारंवार संघावर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीसोहळ्या निमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्र निर्माणाच्या कार्यात १०० वर्षांत संघाने महत्त्वाचे योगदान दिले,असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संघाला वाहिलेले १०० रुपयांचे विशेष नाणे आणि पोस्टाच्या तिकीटाचे अनावरण केले. 

पंतप्रधान मोदी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात बोलताना म्हणाले होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशवराव बळीराम हेडगेवार आणि इतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या लढाईसाठी तुरुंगवास भोगावा लागला होता.

१९४२ मध्ये महाराष्ट्रातील चिमूर येथे एक आंदोलन झाले होते. तेव्हा ब्रिटिश सरकारने संघ कार्यकर्त्यांचा छळ केला होता, असा दावाही पंतप्रधानांनी केला. मोदी म्हणाले, “स्वातंत्र्यानंतरही संघाला हैदराबादच्या निजामांकडून छळ सहन करावा लागला, परंतु संघ राष्ट्र प्रथम या तत्त्वावर आणि एक भारत श्रेष्ठ भारताच्या ध्येयावर ठाम राहिला.”