दक्षिण आफ्रिकेमध्ये करोना विषाणूचा घातक असा ओमिक्रोन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं असून करोनाचा हा नवा विषाणूचा काही देशांमध्ये पसरला आहे. करोनावरील लस घेतलेल्यांमध्ये तयार झालेल्या प्रतिकारशक्तीवर सुद्धा हा ओमिक्रोन व्हेरिएंट मात करत असल्याचं समोर आल्यानं जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
या पार्श्वभुमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बैठक घेत देशातील करोना विषय उपाययोजनांचा आढावा घेतला. दोन तास चाललेल्या बैठकीत ओमिक्रॉन या नव्या करोनाच्या व्हेरिएंटबाबतची सद्य स्थिती पंतप्रधानांनी माहिती करुन घेतली. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. तेव्हा सध्या तरी अशी कोणतीही बंदी घातली गेली नसल्याचं बैठकीनंतर स्पष्ट झालं आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा ही गेले काही महिने विविध निर्बंधांसह सुरु होती, मात्र आता येत्या १५ डिसेंबरपासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे ही पुर्ववत सुरु करण्याचा निर्णय हा नुकताच घेण्यात आला आहे. तेव्हा सध्याची करोनाची बदलती स्थिती लक्षात घेता आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत असलेल्या निर्बंधांचा आढावा घेण्याचे निर्देश पंतप्रधान यांनी यावेळी दिले.
आंतरराष्ट्रीय विमान सेवेबाबत दक्ष रहाण्याच्या सुचना पंतप्रधानांनी यावेळी केल्या. तसंच रिस्क या क्षेत्रात मोडणारे देश ओळखत त्याबाबत करोना विषयक नियमांनुसार करोना टेस्ट सारख्या आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले. दरम्यान या बैठकीत देशातील जीनोम प्रकल्पाचा आढावा मोदी यांनी घेतला. तसंच या प्रकल्पाशी संबंधित नमुने हे आंतराराष्ट्रीय प्रवासी आणि समुहाकडून असलेल्या नियमानुसार घेतले गेले पाहिजेत असंही मोदी यांनी सांगितलं.
दरम्यान या बैठकीत केंद्रीय अधिकाऱ्यांना राज्यांच्या प्रशासनाशी सतत संपर्कात रहाण्याच्या सुचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच जिथे अजुनही करोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी अधिक लक्ष घालण्याचे निर्देश त्यांनी दिले.