नवी दिल्ली : भाजपविरोधातील ‘इंडिया’ आघाडीच्या रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या जंगी सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘मॅचफिक्सिंग’चा गंभीर आरोप केला. मोदींनी दिलेला ‘चारसो पार’चा नारा मॅचफिक्सिंग केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. लोकसभेची निवडणूक खुली अणि निष्पक्ष झाली तर भाजपसह ‘एनडीए’ला १८० जागादेखील मिळणार नाहीत, अशा शब्दांत गांधी यांनी सणकून टीका केला. 

हेही वाचा >>> केसरकरांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश, सावंतवाडीतील २५० परवानाधारकांपैकी केवळ १३ जणांना नोटीसा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी ‘लोकशाही बचाओ’ सभेत विरोधकांनी जबरदस्त शक्तिप्रदर्शन केले. २०२४ची लोकसभा निवडणूक विरोधकांची गळचेपी करून जिंकण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या ‘सामन्यां’तील विरोधकांसाठी असलेल्या कथित प्रतिकूल परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, चारशे जागा मिळवण्यासाठी या सामन्यांतील पंचदेखील मोदींनी निवडलेले आहेत. मॅचफिक्सिंग करत आमच्या संघातील दोन खेळाडूंना तुरुंगात पाठवले आहे. सामने जिंकण्यासाठी पंचांवर दबाव आणला जात आहे. खेळाडूंना, कप्तानांना धमकावले जात आहे, असा आरोपही केला. भाजपचे नेते अनंतकुमार हेगडे यांनी संविधान बदलण्यासाठी भाजपला चारशे जागा जिंकून देण्याचे आवाहन केले होते. त्याचा संदर्भ देत राहुल यांनी शरसंधान साधले.

‘भ्रष्टाचार बचाओ, परिवार बचाओ’

रामलीला मैदानातील विरोधकांची सभा संपूर्ण फसल्याची टीका भाजपचे दिल्लीतील उमेदवार मनोज तिवारी यांनी केली. ‘भ्रष्टाचार बचाओ, परिवार बचाओ’ असे या सभेचे स्वरूप असून त्यात केवळ काँग्रेसने केलेल्या लुटीमध्ये सहभागी असलेले लालू यादव, मुलायमसिंह यादव, शिबू सोरेन यांचे कुटुंबीय होते, असा हल्लाबोल तिवारी यांनी केला. मनात आले म्हणून भाजपचे नेते संविधान बदलाची भाषा करत नाहीत. जनतेमध्ये कोणती प्रतिक्रिया उमटेल याची चाचपणी करण्यासाठी मुद्दाम अशी वादग्रस्त विधाने केली जातात. मोदींचे मॅचफिक्सिंग यशस्वी झाले तर देशाचे संविधान नष्ट केले जाईल. ही निवडणूक सर्वसाधारण नसून संविधान वाचवण्यासाठी होत असलेली लढाई आहे. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस</p>