G20 Summit Delhi 2023: राजधानी दिल्लीमध्ये आज जगभरातल्या प्रभावशाली देशांचे राष्ट्रप्रमुख एकत्र जमले आहेत. जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने दिल्लीच्या प्रगती मैदानमधील ‘भारत मंडपम’मध्ये या गटाचे सदस्य राष्ट्र, निमंत्रित राष्ट्रांचे प्रमुख, प्रतिनिधी एकत्र आले आहेत. भारताकडे यावेळी जी २० शिखर परिषदेचं अध्यक्षपद आहे. आज व उद्या अर्थात ९ व १० सप्टेंबर रोजी ही परिषद चालणार असून त्यासाठी आज मोदींनी स्वत: भारत मंडपममध्ये सर्व सदस्य राष्ट्रप्रमुखांचं स्वागत केलं.

मोदी-बायडेन यांचा ‘सुहास्यसंवाद’!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत मंडपममधील ज्या ठिकाणी सर्व राष्ट्र प्रमुखाचं स्वागत केलं, तिथे मागच्या बाजूला भव्य असं कोणार्क चक्र (Konark Wheel) उभारण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जेव्हा G20 परिषदेसाठी भारत मंडपममध्ये दाखल झाले, तेव्हा मोदींनी त्यांचं हसतमुखाने स्वागत केलं. यावेळी बायडेन यांचा हात हातात धरून मोदी त्यांना मागील कोणार्क चक्राविषयी माहिती देत होते. या दोघांमध्ये सुहास्यवदनाने संवाद झाला आणि नंतर जो बायडेन सभागृहाच्या दिशेनं रवाना झाले.

कोणार्क चक्राचं काय आहे महत्त्व?

दिल्लीच्या भारत मंडपममध्ये ठिकठिकाणी भारतीय संस्कृती, इतिहासाची माहिती देणारी अशी शिल्प, रचना उभारण्यात आल्या आहेत. त्यातील प्रवेशाच्या ठिकाणीच उभारण्यात आलेलं भव्य कोणार्क चक्र पाहुण्यांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरलं आहे. ओडिशामधील कोणार्क मंदिरात मूळ कोणार्क चक्राची उभारणी करण्यात आली होती.

इसवीसन १३व्या शतकामध्ये राजा नरसिंहदेव पहिला यांच्या कार्यकाळात कोणार्क चक्राची उभारणी करण्यात आली. या चक्राला २४ आरे आहेत. लोकशाहीचं शक्तीशाली प्रतीक म्हणून कोणार्क चक्राकडे पाहिलं जातं. प्राचीन ज्ञानसंपत्ती, आधुनिक संस्कृती आणि रचनाशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणून हे कोणार्क चक्र ओळखलं जातं. या चक्राला काळाचं प्रतीक अर्थात कालचक्र म्हणूनही ओळखलं जातं. शिवाय जगात सातत्यपूर्ण विकास व बदलाचं ते प्रतीक ठरलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक वारसा

युनेस्कोनं १९८४ साली ओडिशाच्या कोणार्क सूर्य मंदिराला जागतिक वारसा (वर्ल्ड हेरिटेज साईट) म्हणून घोषित केलं आहे. ओडिशातील पुरीपासून ते अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर आहे.