पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी लखनऊ दौऱ्यावर होते. त्यावेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींसोबतचे दोन फोटो शेअर केले होते. या फोटोंची देशभरामध्ये चर्चा झाली. फोटोमध्ये पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर हात ठेऊन फिरताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये मोदी आणि योगींमध्ये एखाद्या गंभीर विषयावर चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे. या दोन्ही नेत्यांचे फोटो समोर आल्यानंतर नक्की हे दोघे काय चर्चा करत होते वगैरे विषयावर अनेक शक्यता व्यक्त करण्यात आल्या. मात्र आता या दोन नेत्यांमधील चर्चेबद्दल, त्यांनी काय गप्पा मारल्या याबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री आणि लखनऊचे भाजपाचे खासदार राजनाथ सिंह यांनी खुलासा केलाय.

नक्की वाचा >> “साहेब ज्यांना अशापद्धतीने भेटले ते पुन्हा सत्तेत आले नाहीत”; मोदी-योगींच्या ‘त्या’ फोटोवरुन टोला

सिंह यांनी गुरुवारी आपल्या एका भाषणाचा छोटा व्हिडीओ ट्विट केला. या ट्विटमधील भाषणामध्ये त्यांनी म्हटलंय की, “नुकताच ट्विटरवर एक फोटो व्हायरल झाल्याचं पहायला मिळालं ज्यामध्ये पंतप्रधान मोदी योगींच्या खांद्यावर हात टाकून काहीतरी सांगताना दिसले. पंतप्रधान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना काय सांगत आहेत याबद्दल तर्क लढवले जात होते. यावेळी पंतप्रधानांनी, ‘योगीजी, तुम्ही एखाद्या धडाकेबाज खेळाडू प्रमाणे फलंदाजी करत आहात आणि तुम्हाला तुमचा हा शानदार फॉर्म असाच सुरु ठेवला पाहिजे. यामुळे भाजपाला विजय मिळवण्यास फायदा होईल’, असं सांगितलं.”

नक्की वाचा >> “तुमसे ना हो पाऐगा…”, “”जगाला दाखवण्यासाठी राजकारणामध्ये तुम्हाला काही..”; ‘त्या’ फोटोवरुन विरोधकांचे टोमणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच पूर्वांचल द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशात पुढील वर्षारंभी विधानसभेची निवडणूक होणार असून योगी आदित्यनाथ सरकारकडून विविध विकासकामांचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी रविवारी ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. विकासाच्या मार्गाने नवा देश घडवण्याच्या संकल्प आम्ही केलाय अशा अर्थाची कॅप्शन योगी यांनी या फोटोला दिली होती. योगी आदित्यनाथ यांनी शेअर केलेल्या दोन फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी योगींच्या पाठीवर हात ठेऊन चालल्याचं दिसतायत. योगींच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोंपैकी एक फोटो समोरुन तर एक फोटो पाठमोरा आहे.

या फोटोवरुन विरोधकांनीही योगी आणि मोदींवर निशाणा साधला होता. भाजपाचा सर्वात मोठा विरोधी पक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांनी ट्विटरवरुन टोला लगावला. “जगाला दाखवण्यासाठी राजकारणामध्ये तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. जसे की एखाद्याच्या खांद्यावर हात ठेऊन काही पावलं एकत्र चालणं,” असं म्हणत अखिलेश यांनी या फोटोवर योगींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या हम तो फकीर आदमी हैं भाई, झोला उठा के चल दिये या वक्तव्याची आठवण करुन देत काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी या फोटोवर कमेंट केली. योगी आता स्वत: जातात की त्यांना लाथ मारुन हाकललं जातं हे येणारा काळच सांगेल, असं राजपूत म्हणाले.