आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राजीनामा देण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. पंतप्रधान निवडणुकीपूर्वीच राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते. त्यामुळे माध्यमांमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने हा खुलासा केला.
पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. येत्या शुक्रवारी डॉ. सिंग नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. पंतप्रधानपदाच्या चालू कार्यकाळातील ही तिसरी पत्रकार परिषद असणार आहे. त्यामुळेच पंतप्रधान राजीनामा देणार का, या विषयावर चर्चा सुरू झाली होती.
डॉ. सिंग राजीनामा देऊन त्याजागी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी विराजमान केले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण कॉंग्रेस पक्षाने दिलेले नाही.