पाकिस्तानने आपल्या तसेच आपल्या नियंत्रणाखालील भूमीवरून भारतविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणे थांबवावे. भारत आपल्या सीमेचे तसेच जवानांचे रक्षण करण्यासाठी कोणतीही भूमिका घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे सांगत पाकिस्तानला आमच्याशी सलोख्याचे संबंध हवे असतील तर या कागाळ्या बंद कराव्यात, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला सुनावले. भारताच्या ६७व्या स्वातंत्र्यदिनी जनतेला उद्देशून ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात त्यांनी अन्नसुरक्षा विधेयकापासून ते दारिद्रय़रेषा निश्चित करण्यापर्यंत, पायाभूत सुविधांपासून ते कौशल्य विकास कार्यक्रमांपर्यंत अनेक मुद्दय़ांना हात घातला. नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळत सांप्रदायिकतेला आधुनिक भारतात स्थान नसल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक मंदीच्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून गेल्या ९ वर्षांतील आपला सरासरी आर्थिक विकास दर हा निश्चितच आशादायी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. २०१२-१३ या आर्थिक वर्षांत कृषी, उत्पादन आणि खाण क्षेत्रांमधील देशाची कामगिरी सुमार झाल्याने आपला वाढीचा दर ५ टक्क्य़ांवर आला, पण अशा आर्थिक आव्हानांना सामोरे जाणारे भारत हे काही जगातील एकमेव राष्ट्र नाही, असेही पंतप्रधानांनी निक्षून सांगितले. आपला गेल्या ९ वर्षांतील आर्थिक वाढीचा सरासरी दर ७.९ टक्के असून तो निश्चितच आपल्या क्षमतांची जाणीव करून देणारा आहे, असे डॉ.सिंग म्हणाले. दारिद्रय़ निर्मूलन, दर्जेदार शिक्षणाचा प्रसार आणि उत्तम आरोग्य सेवा ही मूलभूत उद्दिष्टे आहेत आणि त्यांच्या पूर्ततेसाठी आर्थिक विकास दरांत वाढ होणे अनिवार्य आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. बिहारमधील २३ मुलांचा बळी घेणाऱ्या माध्यान्ह भोजन दुर्घटनेनंतर अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करणार आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केले.

अर्थव्यवस्था
अर्थव्यवस्था वाढीच्या दराने गेल्या दहा वर्षांतील नीचांक गाठला असला तरीही लवकरच या संकटातून आपली अर्थव्यवस्था बाहेर पडेल आणि आपली वृद्धी पुन्हा सुरू होईल, असा आशावाद स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला.