Kailash Makwana : मध्य प्रदेश पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी कैलाश मकवाना यांनी इंटरनेट, मोबाइल फोन आणि अल्कोहोल यामुळे समाजातील मूल्यं संपत चालली आहेत त्यामुळेच बलात्कारांच्या घटना वाढत आहेत असं विधान केलं आहे. पोलीस एकट्यानेच काही बलात्कारांच्या घटना थांबवू शकत नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
उज्जैन या ठिकाणी मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक कैलाश मकवाना हे आले होते. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारला गेला. ज्याच्या उत्तरात कैलाश मकवाना म्हणाले, “लोकांकडे सध्या आक्षेपार्ह गोष्टी पाहण्यासाठीचा सहज पर्याय उलब्ध आहे. इंटरनेटवर तुम्ही काहीही पोस्ट करा तुम्हाला ते पाहता येतं. मोबाइल आणि त्यातलं इंटरनेट हे आज प्रत्येकाच्या हाती आहे. त्यामुळे लोक त्यांना काय पाहिजे ते पाहतात. अल्कोहोल म्हणजेच दारु हवी तितकी, हवी तेव्हा पितात. इंटरनेट, मोबाइल फोन, अश्लील गोष्टी सहज उपबल्ध होणं या सगळ्यामुळे समाजाची मूल्यं ढासळत चालली आहेत. फक्त पोलिसांनी बलात्कार रोखावेत अशी अपेक्षा असेल तर ते शक्य नाही. घरात एकमेकांकडे कुणाचं लक्ष नाही. आई-वडील आणि शिक्षक यांचं म्हणणं विद्यार्थी ऐकत होते. आता ही परिस्थिती नाही. तसंच इंटरनेटवरुन जी काही अश्लीलता पसरवली जाते आहे त्यामुळे मुलांच्या मनात लहान असल्यापासूनच विकृतीचा जन्म होतो. त्यामुळे बलात्कारांसारख्या घटना घडतात. पोलीस एकट्याने बलात्कार रोखू शकत नाहीत.”
कोण आहेत कैलाश मकवाना?
कैलाश मकवाना यांची नियुक्ती गेल्या वर्षी १ डिसेंबर २०२४ ला मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणून झाली आहे. कैलाश मकवाना हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालक पदाच्या आधी त्यांच्याकडे मध्य प्रदेश पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनचं अध्यक्षपद होतं. २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांची सातवेळा बदली झाली आहे. भोपाळ, दिल्ली या ठिकाणी त्यांनी काम केलं आहे.
मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. बलात्कारांच्या घटना वाढल्या आहेत. त्याबाबत प्रश्न विचारला असता मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक कैलाश मकवाना यांनी गुन्हेगारी आणि बलात्कारांच्या घटनांना इंटरनेट, अल्कोहोल आणि सहज उपलब्ध होणाऱ्या अश्लील गोष्टींना दोष दिला आहे. तसंच पोलीस एकट्याने बलात्कार रोखू शकत नाहीत असंही म्हटलं आहे. याबाबत आता कदाचित नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.