Sonam Wangchuk Wife : सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी हा आरोप केला आहे की पोलीस आणि आयबीचे लोक त्यांचा पाठलाग करतात. लडाखचे पर्यावरवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. दरम्यान सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी सर्वोच्च न्यायालयात बोलत असताना पोलीस आणि आयबीवर गंभीर आरोप केला आहे.
गीतांजली यांचा नेमका आरोप काय?
राजस्थान पोलीस आणि इंटेलिजन्सचे ब्युरोचे अधिकारी माझ्यावर नजर ठेवून आहेत. माझा पाठलाग करत आहेत. मी जेव्हा माझे पती सोनम वांगचुक यांना भेटायला जाते तेव्हा दिल्लीला परत येईपर्यंत पोलीस माझ्यासह असतात. मला प्रत्येक गोष्ट त्यांच्या निगराणीखालीच करावी लागते, असं गीतांजली यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर सर्वोच्च न्यायालयात गीतांजली यांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यामध्येच त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. गीतांजली म्हणाल्या, मी ७ ऑक्टोबर आणि ११ ऑक्टोबरला जोधपूर येथे असलेल्या मध्यवर्ती तुरुंगात सोनम वांगचुक यांना भेटायला गेले होते. त्यावेळी जोधपूरच्या विमानतळावर उतरताच मला पोलिसांच्या कारमध्ये बसवण्यात आलं. त्यानंतर मी तुरुंगापर्यंत पोहचेपर्यंत पोलीस माझ्या बरोबरच होते. मला सोनम वांगचुक यांना भेटायचं असेल किंवा बाहेर कुठेही जायचं असेल तर आधी पोलिसांना सूचित करावं लागतं असाही आरोप त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. बार अँड बेंचने हे वृत्त दिलं आहे.
माझा पाठलाग केला जातो आणि पोलीस पिच्छा पुरवतात
गीतांजली यांनी प्रतिज्ञापत्रात असाही आरोप केला आहे की जोधपूरला त्यांना इतर कुणालाही भेटू दिलं जात नाही किंवा दुसरीकडे कुठेही जाऊ दिलं जात नाही. मी एकदा ट्रेनने आले होते, ट्रेन सुटायला भरपूर वेळ होता त्यावेळी मला पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर बसवून ठेवलं. पोलीस अधिकारीही माझ्यासह बसून राहिले होते. ३० सप्टेंबरला जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर माझ्या घराजवळ पोलीस निगराणी ठेवू लागले. मी जेव्हा बाहेर पडते तेव्हा काहीजण माझा बाईक किंवा कारने पाठलाग करतात असाही आरोप गीतांजली यांनी केला आहे.
सोनम वांगचुक यांना २७ सप्टेंबरला अटक
लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आंदोलन झाले होते. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये बुधवारी हिंसक संघर्ष झाला होता. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू आणि ८० जण जखमी झाले होते. सरकारने या हिंसाचारासाठी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले असून, २७ सप्टेंबरला त्यांना लडाख पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांनी म्हटले होते की, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यामुळे जर अटक झाली तर त्यांना आनंद होईल. दरम्यान अटकेनंतर त्यांची रवानागी जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.