Delhi Police : बलात्कारच्या प्रकरणातील आणि एका व्यक्तीची हत्या केल्याच्या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी तब्बल १७ वर्षांनंतर बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. २००८ च्या खूनाच्या खटल्यात आणि २०२३ मधील बलात्कार प्रकरणानंतर हा आरोपी फरार झाला होता. मात्र, याच आरोपीला आता दिल्ली पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडलं आहे. मोहम्मद आलम (४३) असं या आरोपीचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे.
बिहारमध्ये २००८ मध्ये घडलेल्या एका खून प्रकरणात तो आरोपी होता. त्याने त्याच्या पाच साथीदारांसह एका व्यक्तीची चाकूने वार करून हत्या केली होती असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, १,१०० किलोमीटरहून अधिक किमी प्रवास आणि २० तासांच्या कारवाईनंतर आणि एका एक्सप्रेसच्या अनेक डब्यांमध्ये तीन ते चार तासांच्या तणावपूर्ण शोधमोहीम केल्यानंतर आरोपीला अखेर जळगाव जंक्शन रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
मोहम्मद आलम या बनावट नावाने ओळखला जाणारा व्यक्ती कायदेशीर कारवाईतून वाचण्यासाठी गुजरातमधील वलसाड येथे जात होता. बिहारमधील मुझफ्फरपूर येथे तोकीर खान नावाच्या व्यक्तीची कथित हत्या केल्यानंतर आलम २००८ पासून फरार होता. गुन्हा दाखल असूनही आलम जवळजवळ दोन दशकं अटक टाळण्यात यशस्वी झाला. आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत बलात्कार आणि पोक्सो कायद्याच्या एका प्रकरणातही त्याच्यावर आरोप आहे. त्या प्रकरणाचे आरोपपत्र दाखल केल्यानंतर २०२३ मध्ये त्याला मिळालेल्या अंतरिम जामीनानंतर तो फरार झाला होता.
दरम्यान, ६ मे रोजी या आरोपीबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने संशयिताचा ट्रेन क्रमांक घेतला आणि तपास सुरु केला. आरोपी बिहारमधील मुझफ्फरपूरहून महाराष्ट्र आणि गुजरातकडे प्रवास करत होता. याचवेळी एक पथक दिल्लीहून निघालं होतं आणि मध्य प्रदेशातील इटारसी जंक्शनवर पोहोचलं. आता पोलीस आरोपीला शोधण्यासाठी ट्रेनमध्ये चढले पण आरोपी नेमकं कोणत्या डब्यात आहे हे पोलिसांना माहिती नव्हतं.
त्यामुळे पोलिसांनी चालत्या ट्रेनमध्ये संपूर्ण शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर पुढील काही तासांत पोलिसांनी आरोपी आलमला जळगाव जंक्शनवरून अटक केली. अटकेनंतर आलमला दिल्लीला आणण्यात आलं असून पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती सुरु आहे. तसेच आरोपीने चौकशीदरम्यान कबूल केले की त्याने ओळख पटू नये म्हणून त्याचे स्वरूप स्थान आणि संपर्क तपशील वारंवार बदलले.