भाजपा पैशाच्या बळावर आपले सरकार अस्थिर करण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. भाजपाने हे प्रकार थांबवले नाहीत तर मी जनतेला त्यांच्या विरोधात बंड पुकारण्याचे आव्हान करेन. मी शांत बसणार नाही. त्यांना काय वाटते? त्यांनाच राजकारण कळते ? अशा परिस्थितीत काय करायचे ते मला सुद्धा कळते असे कुमारस्वामी म्हणाले. उदयगिरी हसन येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
देवेगौडा कुटुंबाने राज्याच्या संपत्तीची लूट चालवली असल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला आहे. येडियुरप्पा सत्ताधारी पक्षातील १५ ते २० आमदारांना फोडून भाजपामध्ये आणतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
येडियुरप्पा तु्म्ही काचेच्या घरात बसून आमच्यावर दगड मारण्याचा प्रयत्न करत आहात. हे सरकार माझ्या हातात आहे हे विसरु नका आणि मी काहीही करु शकतो असा इशारा कुमारस्वामी यांनी येडियुरप्पांना दिला. कुमारस्वामींच्या या इशाऱ्याला उत्तर देताना येडियुरप्पा यांनी गौडा कुटुंबाची सर्व बेकायद कृत्ये उघड करण्याची धमकी दिली. केंद्रात आमचे सरकार आहे हे कुमारस्वामींनी विसरु नये असा सूचक इशारा त्यांनी दिला.